आता गोळ्या घातल्या तरी मागे हटणार नाही, मनोज जरांगेंचा निर्धार

नाशिक । मराठा आरक्षणासाठी मोठं शक्तिप्रदर्शन करत मनोज जरांगे पाटील मुंबईत दाखल झाले. आता डोक्यावर गुलाल पडल्याशिवाय हलायचे नाही असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. आंदोलकांनी सरकार आणि पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहनही मनोज जरांगे यांनी केले.

यावेळी बोलताना जरांगे पाटील म्हणाले, ठरल्याप्रमाणे आझाद मैदानात उपोषण सुरू केले आहे. सरकार सहकार्य करत नव्हतं म्हणून मराठे मुंबईत आले. आंदोलनाची परवानगी देण्यात आली नव्हती, मात्र नंतर सरकारने परवानगी दिली. सरकारने सहकार्य केले, आता आपणही सहकार्य करू, असे जरांगेंनी सांगितले.

कोणीही जाळपोळ, दगडफेक करायची नाही. गोंधळ घालायचा नाही, असे आवाहनही त्यांनी समाजबांधवांना केले. तसेच या ठिकाणी गर्दी झाली आहे. काही आंदोलकांनी नवी मुंबईतील वाशी येथे जावे, पुढील दोन तासांत मुंबई रिकामी करा, काहीजण वाशीत मुक्काम करा, असेही ते म्हणाले.

जरांगे पुढे म्हणाले, आता गोळ्या घातल्या तरी मागे हटणार नाही. डोक्यावर गुलाल पडल्याशिवाय इथून उठायचे नाही, असेही ते म्हणाले. आपण कोणाला बोलायला संधी द्यायची नाही. दारू प्यायची नाही. माझ्या समाजाला मान खाली घालावी लागेल असे वागू नका. याच आझाद मैदानात राहायचे आणि झोपायचे, असे मनोज जरांगे उपस्थित मराठा आंदोलकांना म्हणाले.

काय आहेत प्रमुख मागण्या
मराठा कुणबी एक आहेत, याची अंमलबजावणी झाली पाहिजे.
हैदराबाद गॅझेटियर लागू करा.
सातारा, बॉम्बे गॅझेटियर लागू करावे.
मराठा आंदोलकांवरील सरसकट गुन्हे मागे घ्या.
आमचं कायद्यात बसणारे आरक्षण द्या.

error: Content is protected !!