Maratha Reservation : नाशिकमध्ये मराठा, ओबीसी संघटना पदाधिकार्‍यांचे गळ्यात गळे

नाशिक । आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा तापला असताना, नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात ओबीसी संघटना व मराठा समाजाच्या पदाधिकार्‍यांची एकत्रित उपस्थिती पाहायला मिळाली. जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यासाठी आलेल्या दोन्ही संघटनांच्या पदाधिकार्‍यांनी एकमेकांच्या गळ्यात गळे घालत मुक्त संवाद साधला. दोन्ही संघटनांमध्ये आरक्षणावरून मतभेद असतानाही नाशिकमध्ये मात्र प्रत्येक संघटनेने आपापले म्हणणे जिल्हाधिकार्‍यांसमोर मांडत सार्वजनिक व्यासपीठावर सौहार्दपूर्ण संबंध जपले.

सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा पेटला आहे. मनोज जरांगे यांनी मुंबईतील आझाद मैदानात आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण सुरू केले आहे. राज्यभरातून मराठा बांधव या आंदोलनासाठी मुंबईत दाखल होत असताना आता मुंबई उच्च न्यायालयाने आंदोलनाबाबत सरकारला फटकारले आहे.

राज्यभरातून आलेल्या मराठा बांधवांसाठी मदतीचा ओघ सुरू झाला असून जेवण आणि जीवनावश्यक साहित्य घेऊन जाणारी वाहने मुंबईबाहेर अडवली जात असल्याचा आरोप मराठा संघटनांनी केला आहे. एकूणच या सर्व आंदोलनाबाबत आता ओबीसी संघटनाही आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे.

राज्याचे मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत ओबीसी संघटनांच्या प्रमुख पदाधिकार्‍यांची बैठक झाली. या बैठकीत मराठा समाजाला सरसकट आरक्षण देण्यास विरोध दर्शविण्यात आला आहे. तसेच ओबीसींवर अन्याय झाल्यास आम्ही देखील मुंबईत धडक देऊ असा इशारा मंत्री छगन भुजबळ यांनी दिल्याने हा मुद्दा अधिकच तापणार असल्याचे दिसते.

मंत्री भुजबळ यांनी आता ओबीसी संघटनांना तयारीला लागण्याचे आदेश देत जिल्हानिहाय तहसीलदार, जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार नाशिकमध्ये देखील समता परिषदेच्यावतीने मंगळवार दि. २ रोजी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यासाठी ओबीसी संघटनांचे पदाधिकारी जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले. याच दरम्यान मराठा संघटनांचेही पदाधिकारी निवेदन देण्यासाठी उपस्थित झाले होते. दोन्ही संघटना समोरासमोर आल्याने सर्वांचे लक्ष याकडे वेधले गेले.

गेल्या काही दिवसांपासून दोन्ही संघटनांमध्ये सुरू असलेले आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी पाहता यावेळी काहीतरी बाचाबाची होण्याची शक्यताही वर्तविण्यात आली होती. मात्र, जे घडले ते पाहून उपस्थित सुखावले. दोन्ही संघटनांच्या पदाधिकार्‍यांनी मुक्त संवाद साधत आपापले मुद्दे पटवून देण्याचा प्रयत्न केला. इतकेच नव्हे तर एकमेकांच्या गळ्यात गळे घालत आरक्षणापलिकडे एकमेकांमधील सौहार्दपूर्ण संबंधांची वीण अधिक घट्ट केल्याचे दिसून आले.

ओबीसी संघटनेची भूमिका :
मराठ्यांना आरक्षण द्यावे.
ओबीसी आरक्षणातील हिस्सा कमी होता कामा नये.

मराठा समाजाची भूमिका :
मुंबईतील आंदोलनात बाहेरील लोक घुसून गोंधळ घालत आहेत.
प्रशासनाने याची सखोल चौकशी करावी.

error: Content is protected !!