अजित पवारांवर कांदा माळ फेकण्याचा प्रयत्न

अहिल्यानगर । अहमदनगर जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या घटनांमुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. गुरूवारी रात्री संगमनेर येथे शिवसेनेचे आमदार अमोल खताळ यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आल्यानंतर वातावरण तापले असतांनाच शुक्रवारी श्रीगोंदा येथे कांदा दरावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दिशेने कांद्याची माळ फेकण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. अचानक झालेल्या या प्रकारामुळे परिसरात तणाव पसरला. पोलिसांनी आरोपीला तात्काळ ताब्यात घेत परिस्थिती नियंत्रणात आणली असून संगमनेरमध्ये मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

शुक्रवारी श्रीगोंदा येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा शेतकरी मेळावा सुरू असताना कांद्याच्या दरांच्या प्रश्नावरून गोंधळ उडाला. अजित पवार हे मेळाव्यात बोलत असतांना त्यांना कांदा प्रश्नाबाबत बोलण्याची विनंती करण्यात आली. मात्र, भाषणादरम्यान कांद्याबाबत अजित पवारांकडून काहीही प्रतिक्रिया न आल्याने काही कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला. यावेळी, संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते हातात कांद्याच्या माळा घेऊन पुढे आले. त्यातील एका कार्यकर्त्याने माळ अजित पवारांकडे फेकण्याचा प्रयत्न केला. मात्र, उपस्थितांनी आणि पोलिसांनी वेळीच तो रोखला.

या प्रकरणी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष अरविंद कापसे आणि तालुका अध्यक्ष नाना शिंदे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. कांद्याचे दर घसरल्यामुळे शेतकर्‍यांचे मोठे नुकसान होत असल्याचा मुद्दा घेऊन ब्रिगेडकडून सरकारवर दबाव आणला जात आहे. यापूर्वी लातूरमध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तत्कालीन अध्यक्ष सूरज चव्हाण यांच्याकडून संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकार्‍याला मारहाण झाल्याची घटना घडली होती. त्यानंतरपासून ब्रिगेड कार्यकर्त्यांमध्ये राष्ट्रवादीविरोधात नाराजी आहे.

error: Content is protected !!