Nashik: गोदा प्रदूषणमुक्तीसाठी पर्यावरणप्रेमींचे अनोखे उपोषण

नाशिक । गोदावरी नदीच्या दिवसेंदिवस बिघडत चाललेल्या आरोग्यावर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत मला आई गोदावरी स्वच्छ पाहिजे असा फलक हाती घेत अविरल निर्मल गोदा अभियानाच्या अंतर्गत पर्यावरणप्रेमींनी साखळी उपोषण सुरू केले आहे. या उपोषणाच्या माध्यमातून गोदावरी प्रदूषणमुक्तीसाठी लवकरात लवकर ठोस पावले उचलण्याची मागणी करण्यात आली आहे.

गोदावरी नदीत नाल्यांचे सांडपाणी, औद्योगिक कचरा आणि धार्मिक विधींमध्ये टाकण्यात येणार्‍या वस्तूंच्या वाढत्या प्रमाणामुळे नदीचे पाणी अत्यंत प्रदूषित झाले आहे. पंचवटी, रामकुंड, गोदाघाट या प्रमुख घाटांवर गोदावरीत थेट सांडपाणी मिसळत असल्याचे अनेक वेळा निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर पर्यावरणप्रेमींनी आता आंदोलनाची भूमिका घेतली आहे.

उच्च न्यायालयाच्या निर्देशांना हरताळ

सदर विषयावर २०१२ साली पर्यावरणप्रेमी याचिकाकर्त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयाने त्यानुसार एक समिती गठित केली होती तसेच NEERI (राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था) यांना गोदाप्रदूषणावर सविस्तर अहवाल देण्याचे निर्देश दिले होते. २०१४ मध्ये नीरीने आपला अहवाल सादर केला होता. या अहवालानुसार, गोदावरी प्रदूषणमुक्तीसाठी अनेक ठोस उपाय सुचवण्यात आले होते. न्यायालयाने गठित समितीने दर तीन महिन्यांनी बैठक घेऊन अंमलबजावणी करावी असे स्पष्ट आदेश दिले होते. मात्र आजही गोदावरीची स्थिती जैसे थे असल्याने याचिकाकर्त्यांनी संताप व्यक्त केला आहे.

घरातूनच उपोषण सुरू

आंदोलनासाठी अधिकृत जागा मिळत नसल्यामुळे हे साखळी उपोषण काही पर्यावरणप्रेमींनी आपल्या घरातूनच सुरू केले आहे. आम्हाला फक्त एवढंच म्हणायचं आहे – मला आई गोदावरी स्वच्छ पाहिजे. असे आवाहन करत उपोषणकर्त्यांनी प्रशासनाकडे नीरीच्या सूचनांची अंमलबजावणी करावी, यासाठी कालबद्ध कार्यक्रम आखावा अशी ठाम मागणी केली आहे.

विभागीय आयुक्तांची भेट घेणार

याचिकाकर्ते आणि पर्यावरण कार्यकर्ते लवकरच विभागीय आयुक्तांची भेट घेऊन आपली मागणी अधिक ठोसपणे मांडणार आहेत. या लढ्याला शहरातील अनेक संस्था आणि नागरिकांचा सक्रिय पाठिंबा लाभत आहे. हे केवळ नदीचे नव्हे तर नाशिक शहराच्या पर्यावरणाचे आणि संस्कृतीचे संरक्षण करण्याचे आंदोलन आहे असे याचिकाकर्त्यांनी म्हटले आहे.

error: Content is protected !!