नाशिक : स्वच्छ भारत अभियान 2.0 अंतर्गत नाशिक महापालिकेच्या वतीने आयोजित प्लास्टिक कचरा संकलन स्पर्धेत मविप्र संचलित, सिडको परिसरातील अभिनव बालविकास मंदिर, उत्तमनगर या शाळेने तृतीय क्रमांक पटकावून उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
मुख्याध्यापिका ज्योती पवार यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये प्लास्टिक बंदीबाबत जनजागृती उपक्रम राबविण्यात आले. विद्यार्थ्यांना प्लास्टिक कचरा संकलनासाठी प्रेरित करण्यात आले आणि त्यांनी घराघरातून व परिसरातून प्लास्टिक जमा करून शाळेत आणले. शाळेत विविध प्रबोधन कार्यक्रम, माहितीपर पोस्टर्स आणि प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून प्लास्टिकचे पर्यावरणावर होणारे परिणाम समजावण्यात आले.
प्लास्टिक कचऱ्याचे दुष्परिणाम
प्लास्टिक अत्यंत नाशवंत नसल्यामुळे ते शेकडो वर्षे पर्यावरणात टिकून राहते. ते जमिनीत मिसळले तर जमिनीची सुपीकता कमी होते, पाण्यात गेल्यास जलचर प्राण्यांचे प्राण घेतो. प्लास्टिक जाळल्यास हानिकारक विषारी वायू हवेत मिसळतो. त्यामुळे मानवी आरोग्यालाही गंभीर धोका निर्माण होतो.
अशा प्रकारचे ज्ञान विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवून शाळेने केवळ स्पर्धेसाठी नव्हे तर दीर्घकालीन जनजागृतीचे कार्य केले आहे. “स्पर्धेत तृतीय क्रमांक ही आमच्यासाठी प्रेरणा आहे. पुढेही प्लास्टिकबंदी उपक्रम सुरूच राहतील. नाशिक शहर प्लास्टिकमुक्त करण्यासाठी आमच्या शाळेचा कायम सहभाग राहील,” असे मत मुख्याध्यापिका पवार यांनी व्यक्त केले.
या यशाबद्दल मविप्रचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे, पदाधिकारी, संचालक, व शिक्षणाधिकारी यांनी शाळेचे, शिक्षकांचे आणि विद्यार्थ्यांचे कौतुक करत अभिनंदन केले.











