नाशिक । समृध्दी महामार्गावरील अखेरचा टप्पा इगतपुरी ते आमणे या ७६ किलोमीटरच्या महामार्गाचे उदघाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. या महामार्गामुळे नाशिक मुंबई अंतर दोन तासांवर जरी आले असले तरी नाशिकहून समृध्दी महामार्गे प्रवास करण्यासाठी अवघ्या ४ किलोमीटरसाठी १४० रूपयांचा टोल भरावा लागतो तसेच समृध्दी महामार्गावर आकारला जाणारा टोल असा दुहेरी भुर्दंड सहन करावा लागत असल्याने यात सवलत देण्याची मागणी महाराष्ट्र चेंबरचे उपाध्यक्ष संजय सोनवणे यांनी शासनाकडे केली आहे.
राज्यात नाशिक हे वेगाने विकसित होणारे असे शहर आहे. समृध्दी महामार्गाने मुंबईला जाणे हे अवघ्या ३ तासात शक्य होणार आहे. नाशिकहून मोठ्या प्रमाणावर नाशवंत कृषीमाल व इतर उत्पादनांची निर्यात होत असते. या महामार्गामुळे कमी वेळात जेएनपीटी बंदराकडे माल वाहतूक होणार आहे. त्यामुळे वेळ आणि खर्चातील मोठी बचत सर्वांसाठी लाभदायक असणार आहे.
सध्या घोटी येथे टोल भरून जुन्या मार्गाने गोंदे ते वडपे पुढे जाता येते ती टोलची रक्कम प्रवासी वाहनांसाठी १४० रुपये अशी आहे. तर मालवाहतूक वाहनांसाठी ५०० हुन अधिक रक्कम द्यावी लागते. नवीन समृध्दी महामार्गाने गेल्यास टोलची ८० किलोमीटरसाठी २०० रुपये इतकी रक्कम आहे. तसेच मालवाहतूक वाहनांना ५०० रुपयांहून अधिक रक्कम द्यावी लागणार आहे.
घोटी टोल नाका ते समृध्दी महामार्ग हे अंतर केवळ ३ -४ किलोमीटर असे आहे. त्यामुळे नाशिकहून समृद्धी मार्गे मुंबई अथवा जेपीटी येथे जायचे असेल तर मोठा डबल टोल टॅक्सचा भुर्दंड भरणे हे अन्ययकारक आहे.
इतक्या कमी अंतरासाठी एवढी मोठी रक्कम नाशिककरांना भरणे हे अन्यायकारक आहे.
मुंबईला जाण्यासाठी दुहेरी टोल द्यावा लागत आहे. या दुहेरी टोलमधून एकच टोल घेण्यात यावा किंवा घोटी येथे घेतला जाणारा १४० रुपये टोल २५ रूपये करण्यात यावा तसेच समृद्धी महामार्गावरील घोटी ते ठाण्यापर्यंतची टोलची रक्कम कमी करण्यात यावी अशी मागणी केंद्रिय रस्ते वाहतूक महामार्ग मंत्री नितिन गडकरी यांच्याकडे पत्राद्वारे महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँण्ड अग्रिकल्चरतर्फे अध्यक्ष ललित गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली उपाध्यक्ष संजय सोनवणे यांनी केली आहे.











