अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर होणारे बालविवाह रोखण्यासाठी यंत्रणा सज्ज

नाशिक । अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर ग्रामीण व विशेषतः आदिवासी भागांमध्ये होणारे बालविवाह रोखण्यासाठी गावपातळीवरील सर्व यंत्रणांनी सज्ज राहावे, अशी स्पष्ट सूचना उपजिल्हाधिकारी तुकाराम हुलवळे यांनी केली आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात बालविवाह निर्मूलनासाठी जिल्हा कृती दलाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.

ही बैठक जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभाग, युनिसेफ आणि एसबीसी-३ यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आली होती. उपजिल्हाधिकारी हुलवळे यांनी सांगितले की, “अक्षय तृतीया या शुभमुहूर्तावर पारंपरिक प्रथा म्हणून बालविवाह लावले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पोलीस, ग्रामपंचायत, आरोग्य, शिक्षण व महिला आणि बाल विकास विभाग यांनी परस्पर समन्वय साधत गावोगाव जनजागृती मोहिमा राबवाव्यात

सोशल मीडियाचा प्रभावी वापर करा
हुलवळे यांनी सर्व यंत्रणांना सोशल मीडियाचा प्रभावी वापर करण्याचा सल्ला दिला. विशेषतः दुर्गम भागात राहणार्‍या नागरिकांपर्यंत योग्य संदेश पोहोचवण्यासाठी व्हिडिओ, माहितीपट, पोस्टर्स व जनजागृतीपर संदेश प्रसारित करावेत, असेही त्यांनी नमूद केले.

बालविवाहमुक्त जिल्ह्यासाठी ठोस पावले
जिल्ह्यातील ज्या गावांमध्ये बालविवाहाचे प्रमाण अधिक आहे, तिथे सक्षम युवा शक्ती कार्यक्रमांतर्गत सक्षम दिवस’ राबवले जाणार आहेत. या कार्यक्रमाच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांपासून पालकांपर्यंत सर्वांमध्ये विवाहाचे कायदेशीर वयोमर्यादेचे भान निर्माण केले जाईल. बालविवाह निर्मूलनासाठी तयार करण्यात आलेला ‘जिल्हा कृती आराखडा’ सध्या अंमलबजावणीच्या टप्प्यात आहे. यात ग्रामपंचायत, महिला व बाल विकास, शिक्षण, आरोग्य विभाग व जिल्हा बाल संरक्षण कक्ष यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.

नाव राहील गोपनीय
कोणत्याही गावात बालविवाह होण्याची शक्यता असल्यास नागरिकांनी १०९८ या टोल-फ्री क्रमांकावर त्वरित माहिती द्यावी. माहिती देणार्‍याचे नाव गोपनीय ठेवले जाईल, अशी ग्वाही उपजिल्हाधिकारी हुलवळे यांनी दिली.

१२५ शाळांमध्ये घेतले जनजागृती कार्यक्रम
बालविवाह निर्मूलनासाठी सध्या जिल्ह्यात १२५ शाळांमध्ये विद्यार्थ्यांसह पालकांसाठी विशेष जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात आले आहेत. या उपक्रमांमुळे तरुणांमध्ये कायद्याचे भान आणि जबाबदारीची भावना निर्माण होईल, असा विश्वास समितीकडून व्यक्त करण्यात आला.

error: Content is protected !!