अपघात ग्रस्त विमानातूनगुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपानी असण्याची शक्यता

अहमदाबाद – गुजरातमधील अहमदाबाद शहरात आज एक मोठी विमान दुर्घटना घडली असून, एअर इंडियाचं बोईंग 737 प्रवासी विमान कोसळल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या अपघातात विमानातील सर्व २४२ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. विशेष म्हणजे, या विमानात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानीही असावेत, अशी माहिती प्राथमिक स्वरूपात समोर येत आहे.

हा अपघात अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळील मेघानीनगर भागात घडला. उड्डाण घेतल्यानंतर काही क्षणांतच विमान बिघडून खाली कोसळल्याचं सांगितलं जातं. अपघात इतका भीषण होता की विमानाचे तुकडे होऊन परिसरात विखुरले गेले आहेत. या दुर्घटनेत विमान ज्या इमारतीवर कोसळलं, तिचंही मोठं नुकसान झालं असून आजूबाजूच्या भागातही हादरा बसला आहे.

घटनास्थळी प्रचंड आगीच्या ज्वाळा आणि काळ्या धुराचे लोट आकाशात झेपावताना दिसले. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या ७ गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या असून, आग काही प्रमाणात नियंत्रणात आणण्यात आली आहे. अपघातानंतर स्थानिक सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आपत्कालीन परिस्थिती जाहीर करण्यात आली असून सर्व डॉक्टरांच्या रजा रद्द करण्यात आल्या आहेत.

या विमानात प्रवाशांसह क्रू मेंबर्सचा समावेश होता. अहमदाबाद पोलिस नियंत्रण कक्षाने अपघाताच्या घटनेला दुजोरा दिला असून, हे विमान लंडनला जाण्यासाठी निघालं होतं. विमानतळापासून सुमारे १५ किलोमीटर अंतरावर, मेघानीनगरच्या धारपूर परिसरात हे विमान कोसळल्याची माहिती आहे.

सध्या मदत व बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू असून, अपघाताचे कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. दुर्घटनेचे अनेक व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर समोर येत असून, त्यामध्ये भीषण परिस्थिती स्पष्टपणे दिसून येते.

error: Content is protected !!