नाशिक । नागरिकांना त्यांच्या अधिकारांनुसार वेळेत सेवा मिळावी यासाठी जिल्हा प्रशासनाने आता आपलं सरकार सेवा केंद्रांवरील मनमानी कारभाराला चाप बसवण्याचा निर्णय घेतला आहे. सेवा हक्क दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी यासंदर्भात स्पष्ट भूमिका मांडली.
सेवा हक्क दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात आज सकाळी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे, उपजिल्हाधिकारी तुकाराम हुलवळे (प्रशासन), बागलाणच्या उपविभागीय अधिकारी कल्पना ठुबे, जिल्हा पुरवठा अधिकारी कैलास पवार, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी (सामान्य प्रशासन), राज्य सेवा हक्क आयोगाच्या नाशिक कार्यालयातील कक्ष अधिकारी उदय काण्णव आदी उपस्थित होते.
यावेळी बोलतांना जलज शर्मा यांनी सांगितले की, लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ लागू होऊन दहा वर्षे पूर्ण झाली असली तरी आजही नागरिकांना वेळेत सेवा मिळण्यात अडचणी येतात. दाखले, प्रमाणपत्रे यासाठी अतिरिक्त पैसे मागणे, सेवेसंबंधी टाळाटाळ यावर नागरिकांनी सातत्याने तक्रारी केल्या आहेत. याला आळा घालण्यासाठी प्रशासनाने ठोस उपाययोजना आखली आहे.
आता प्रत्येक सेवा केंद्रातून दिल्या जाणार्या सेवांवर थेट फीडबॅक घेतला जाणार आहे. सेवेसाठी अर्ज करणार्या नागरिकांना थेट फोन करून सेवा वेळेत मिळाली का, अतिरिक्त पैसे तर मागण्यात आले नाहीत ना याची चौकशी केली जाणार आहे. याशिवाय, सेवा पुरविणार्या कर्मचार्यांवर विशिष्ट उद्दिष्टे ठरवून त्यांच्या कामगिरीचे मूल्यमापन केले जाईल. गैरप्रकार करणार्यांवर कठोर कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे. ई सेवा केंद्र चालकांनी अद्ययावत राहत या सेवा विहित कालावधीत देण्यासाठी प्रयत्न करावेत. तसेच नागरिकांची सनद, महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमाविषयी नागरिकांमध्ये जनजागृती करावी, असेही जिल्हाधिकारी शर्मा म्हणाले.
सेवाभाव हा प्रत्येकाच्या वागणुकीत आणि व्यवहारात दिसायला हवा, असे सांगत जिल्हाधिकारी शर्मा यांनी महसूल कर्मचारी, आपलं सरकार सेवा केंद्र, ई-सेवा केंद्रांतील कर्मचार्यांना सजग राहण्याचा आणि कामात पारदर्शकता आणण्याचा इशारा दिला. यावेळी सेवा हक्क कायद्यात उत्कृष्ट कामगिरी बजावल्याबद्दल बागलाणच्या उपविभागीय अधिकारी श्रीमती ठुबे, सिन्नरचे तहसीलदार सुरेंद्र देशमुख आदींचा जिल्हाधिकारी शर्मा यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.











