नाशिक | मुंबईत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत काँग्रेसच्या आघाडी विभाग प्रमुखांची महत्त्वपूर्ण बैठक सुरू असताना, नाशिक शहरातील काँग्रेस भवन (एम.जी. रोड) येथे 15 ते 20 भाजप कार्यकर्त्यांनी अचानक झूटफूट निदर्शन केल्याचा प्रकार घडला.
या घटनेचा काँग्रेसचे युवा नेते आणि पदाधिकारी आकाश छाजेड यांनी तीव्र शब्दांत निषेध केला आहे. त्यांनी म्हटले की, “शहरातील काँग्रेस पदाधिकारी मुंबईत असताना भाजप कार्यकर्त्यांनी ही भ्याड कृती केली आहे. पदाधिकाऱ्यांची अनुपस्थिती साधून भाजपने भेकडपणा दाखवला आहे.”
आकाश छाजेड पुढे म्हणाले, “आम्हाला या घटनेची माहिती दिली असती, तर भाजपच्या कार्यकर्त्यांना तात्काळ आणि चोख उत्तर दिले असते. नाशिक शहरातील राजकारण दिवसेंदिवस दूषित होत चालले आहे. आजपर्यंत कधीच कुठल्याही राजकीय पक्षाच्या कार्यालयावर अशा प्रकारची निदर्शने झाली नव्हती. ही नाशिकच्या सभ्य आणि सुसंस्कृत राजकीय परंपरेला न शोभणारी कृती आहे.”
असे प्रकार पुन्हा घडल्यास आम्हीही जशास तसे उत्तर देण्यास मागेपुढे पाहणार नाही. भाजपच्या कार्यकर्त्यांना जागा दाखवण्याची हिंमत आमच्यात आहे.असा इशारा यावेळी देण्यात आला.
या घटनेमुळे नाशिक शहरातील राजकीय वातावरण ढवळून निघाले असून, भाजपच्या या कृतीमुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट आहे. भाजपने यापुढे असे कृत्य केल्यास जशास तसे उत्तर देण्याचा इशारा काँग्रेस ने दिला आहे.











