मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस १ जून रोजी नाशिक दौर्‍यावर ?

नाशिक । राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे १ जून रोजी नाशिक दौर्‍यावर येणार असल्याचे समजते. अद्याप मुख्यमंत्र्यांचा दौरा अंतिम झाला नसला तरी त्यादृष्टीने प्रशासनाकडून तयारी सुरू करण्यात आली आहे. या दौर्‍यात मुख्यमंत्री कुंभमेळा आढावा बैठक घेत त्यांच्या उपस्थितीत पर्वणीच्या तारखाही जाहीर करण्यात येणार आहे.

सिंहस्थ कुंभमेळयाच्या पार्श्वभूमीवर आखाडा परिषदेकडून शाही पर्वणीच्या तारखा जाहीर केल्या जातात. परंतू यंदा मुख्यमंत्र्यांची वेळच न मिळाल्याने अद्याप या तारखा जाहीर करण्यात आलेल्या नाहीत. ६ ते १० मे दरम्यान ही बैठक नियोजीत होती. परंतू पहलगाम हल्ल्यानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे ही बैठक होऊ शकली नाही.

आखाडा परिषदेकडून वारंवार मुख्यमंत्र्यांची वेळ मिळावी अशी मागणी करण्यात येत होती. अखेर १ जून रोजी मुख्यमंत्री स्वतः नाशिकमध्ये येऊन कुंभमेळयाच्या तारखा जाहीर करणार आहेत.यापूर्वी देखील फडणवीस यांनी नाशिकमध्ये येत कुंभमेळयाचा आढावा घेत प्राधिकरणाची घोषणा केली होती. अद्याप प्राधिकरणाचा अध्यादेश निघाला नसून या दौर्‍यापूर्वी प्राधिकरण स्थापन करण्याबाबत निर्णय होण्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे.

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आखाडा परिषद कुंभमेळा तारखा जाहीर करणार असल्याने साधू महंतांनी समाधान व्यक्त केले आहे. कुुंभमेळयाची तयारी जरी सुरू करण्यात आली असली तरी,प्रत्यक्षात कामाला सुरूवात झालेली नाही. साधुग्रामसह विविध विषयांबाबत निर्णय होणे अपेक्षित आहे. मुख्यमंत्र्यांच्या दौर्‍यात याबाबत काही निर्णय होतो का हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथील आखाडयांचे प्रत्येकी दोन असे २६ प्रतिनिधीं, पुरोहीत संघाच्या उपस्थितीत ही बैठक होणार असून बैठकीचे ठिकाण अद्याप निश्चित करण्यात आलेले नाही. मात्र, आश्चर्याची बाब म्हणजे प्रथमच १३ आखाडयांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत एकत्रित ही बैठक होणार आहे.

error: Content is protected !!