नाशिकचे पालकमंत्रीपद का अडले? बावनकुळेंनी उघड केलं नेमकं कारण

नाशिक । नाशिक जिल्हयात चार कॅबिनेट मंत्री असूनही अद्याप नाशिकला पालकमंत्री देण्यात आलेले नाही. राज्य मंत्रीमंडळात छगन भुजबळांची एन्ट्री झाल्यानंतर आता नाशिकचे पालकमंत्रीपद कोणाकडे जाते याकडे सर्वांचे लक्ष लागून असतांना नाशिकचे पालकमंत्रीपद का अडले? याविषयी राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यामागचे नेमकं कारण उघड केलं.


नाशिकच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजन यांची नियुक्ती करण्यात आली. मात्र अवघ्या काही तासांत नाशिकच्या पालकमंत्रीपदाला स्थगिती देण्यात आली. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दावोस येथे आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी गेले असल्याने ते दावोसहून परतल्यानंतरच नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा सुटेल असे सांगण्यात येत होते. मात्र आज चार महिने उलटूनही नाशिकच्या तिढा सुटू शकलेला नाही.


मध्यंतरी नाशिक दौर्‍यावर आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याबाबत विचारले असता जिथे पालकमंत्री नाही तिथे पालकत्व मुख्यमंत्र्यांकडे असते असे सूचक वक्तव्य त्यांनी केले होते. त्यामुळे नाशिकचे पालकमंत्रीपद मुख्यमंत्री स्वतःकडे ठेवतात की काय अशीही शक्यता वर्तविण्यात येत आहे. दरम्यान, अचानकपणे राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांची मंत्रिमंडळात एन्ट्री झाल्याने हा तिढा आणखीनच वाढण्याची शक्यता आहे. भुजबळ मंत्री होताच नाशिक शहरात भुजबळच पालकमंत्री अशा आशयाचे बॅनर झळकले.


या एकूण राजकीय परिस्थिती संदर्भात नाशिक दौर्‍यावर आलेले महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना विचारले असतां त्यांनी नाशिकच्या पालकमंत्रीपदाच्या वादाबाबत स्पष्ट खुलासा करतांना सांगितले की, नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी भाजप आग्रही आहे तर राष्ट्रवादीचे सर्वाधिक आमदार असल्याने राष्ट्रवादीनेही या जागेवर दावा सांगितला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या कार्यकाळात दादा भुसे पालकमंत्री होते त्यामुळे शिंदे नाशिकसाठी आग्रही आहेत. त्यामुळे तिनही पक्षांत एकमत होत नसल्याचे ते म्हणाले.


यासंदर्भात तिनही पक्षांचे नेते चर्चा करत आहेत. निश्चितपणे नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा लवकरच सुटेल आम्ही त्याबाबत सकारात्मक आहोत. यावरून महायुतीत कोणताही संघर्ष नाही. तीन पक्षांचे सरकार आहे. राज्यात ३४ ठिकाणी आमचे एकमत झाले हे काय कमी आहे का अशी टिप्पणीही त्यांनी यावेळी केली.

error: Content is protected !!