नाशिक । महावितरण अंतर्गत थेट ग्राहकसेवा देणार्या उपविभाग व शाखा कार्यालयांची पुनर्रचना करण्यात आली असून या पुर्नरचनेनुसार कार्याला नाशिक परिमंडलात सोमवारपासून सुरवात झाली आहे. ग्राहकसेवेसाठी देखभाल व दुरुस्ती आणि महसूल व देयके अशी विभागणी करण्यात आल्यामुळे कर्मचार्यांच्या कामांमध्ये आणखी सुसूत्रता येणार आहे. त्यांच्यावरील कामांचा ताण कमी होणार असून ग्राहकांना अधिक तत्परतेने महावितरणची सेवा मिळणार आहे.
प्रामुख्याने थेट ग्राहकसेवा देणार्या उपविभाग व शाखा कार्यालयांच्या पुनर्रचनेवर भर देण्यात आला आहे. विशेष म्हणजे शहरी, ग्रामीण व दुर्गम भागांतील ग्राहकसंख्या व भौगोलिक क्षेत्रानुसार संबंधित उपविभाग व शाखा कार्यालयांची फेररचना करण्यात आली आहे. सोबतच ग्राहकसंख्येनुसार अभियंता व तांत्रिक कर्मचार्यांची संख्या निश्चित करण्यात आली आहे.
नविन पुनर्रचनेनूसार महावितरणच्या विभाग कार्यालयांमध्ये कोणताही बदल न करता त्यात विभागीय देखभाल व दुरुस्ती पथकाची निर्मिती करण्यात आली आहे. या १० सदस्यीय पथकात अतिरिक्त कार्यकारी अभियंता, सहायक अभियंता व तांत्रिक कर्मचार्यांचा समावेश असेल. विभागातील सर्व उपकेंद्र व ३३ केव्ही वीजवाहिन्यांची देखभाल व दुरुस्तीचे काम या पथकाकडे राहणार आहे. तसेच प्रत्येक विभागात सध्या अस्तित्त्वात सर्व उपविभागांचे महसूल व देयके तसेच देखभाल व दुरुस्ती अशी विभागणी करण्यात येईल. म्हणजे एका विभागात सध्या चार उपविभाग कार्यालय असल्यास पुनर्रचनेत देखभाल व दुरुस्ती तसेच महसूल व देयके असे प्रत्येकी दोन उपविभाग राहतील. देखभाल व दुरुस्ती उपविभागातील अभियंते व तांत्रिक कर्मचारी वीजयंत्रणेची देखभाल व दुरूस्तीचे कामे, नवीन वीजयंत्रणा उभारणे, वीजपुरवठ्याच्या तक्रारींचे निवारण आणि वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याचे कामे करतील. तर महसूल व देयके उपविभागातील अभियंते, कर्मचारी नवीन वीजजोडणी, अचूक बिलिंग, बिलिंग तक्रारींचे निवारण, थकबाकी वसुली ही कामे करणार आहेत. शहरी भागातील शाखा कार्यालयांमध्ये पुर्नरचनेत फेरबदल करण्यात आला आहे. तर ग्रामीण भागातील शाखा कार्यालयांच्या कार्यपद्धतीत अंशतः बदल करण्यात आला आहे.
ही कार्यालये असतील कार्यरत
नाशिक मंडळातील शहर विभाग क्रमांक १ व २ अंतर्गत असलेल्या नाशिकरोड उपविभाग, (विद्युत भवन), पाथर्डी उपविभाग (पाथर्डी फाटा),गंगापूर उपविभाग(सातपूर एमआयडीसी), नाशिक ग्रामीण उपविभाग (शिंदेगाव), नाशिक ग्रामीण उपविभाग (त्र्यंबक), सातपूर उपविभाग(शरणपूर रोड) आणि नाशिक शहर उपविभाग(भद्रकाली) हे सर्व उपविभाग कार्यालय संचलन व सुव्यवस्था (देखभाल व दुरुस्ती) उपविभाग म्हणून कार्य करणार आहेत.
देवळाली उपविभाग (मुक्तिधाम मागे), द्वारका उपविभाग (तीगरानीया रोड), गंगापूर २ उपविभाग (सातपूर एमआयडीसी), सिडको उपविभाग (सिडको) आणि पंचवटी उपविभाग (दिंडोरी रोड) हे सर्व उपविभाग देयक व महसूल उपविभाग निर्माण करण्यात आले आहेत. तर ग्रामीण भागातील कार्यालयांच्या रचनेत कसलाही बदल न करता केवळ मनुष्यबळाची पुनर्रचना करण्यात आली आहे.









