नाशिक । महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाने आपल्या विविध संवर्गातील 47 अधिकारी आणि कर्मचार्यांच्या बदल्या यशस्वीपणे पूर्ण केल्या. ही संपूर्ण प्रक्रिया केवळ सव्वा तासात पार पडली, ज्यामुळे प्रशासकीय कार्यक्षमतेत एक नवीन मानदंड प्रस्थापित झाला आहे.
विशेष बाब म्हणजे, यंदा प्रथमच संगणकिकृत सॉफ्टवेअर आणि दूरदृष्य संवाद प्रणालीचा (व्हिडिओ कॉन्फरन्सिंग) वापर करून समुपदेशन व बदल्यांची प्रक्रिया राबविण्यात आली, ज्यामुळे बदली प्रक्रियेला अभूतपूर्व गती आणि पारदर्शकता प्राप्त झाली.
महामंडळाच्या नाशिक येथील मुख्यालयातून व्यवस्थापकीय संचालक लीना बनसोड यांच्या अध्यक्षतेखाली ही बदली प्रक्रिया राबविण्यात आली. यावेळी महाव्यवस्थापक जयरेखा निकुंभ, व्यवस्थापक लेखा (नि.) मनोजकुमार शर्मा, उपव्यवस्थापक प्रियंका माळुंदे, वरिष्ठ सहायक हर्षाली निकम, माहिती तंत्रज्ञान सल्लागार पंकज कुलकर्णी यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
महाराष्ट्रातील विविध शाखा कार्यालयांमधील कर्मचारी दूरदृष्य संवाद प्रणालीद्वारे या प्रक्रियेत सहभागी झाले. यामुळे राज्यभरातील कर्मचार्यांशी तात्काळ संपर्क साधणे शक्य झाले आणि समुपदेशन प्रक्रिया प्रभावीपणे पार पडली.
बदली प्रक्रियेत प्रथमच संगणकिकृत सॉफ्टवेअरचा वापर करण्यात आला, ज्यामुळे कर्मचार्यांचे प्राधान्यक्रम, प्रशासकीय गरजा आणि उपलब्ध जागांचे व्यवस्थापन त्वरित आणि पारदर्शक पद्धतीने करता आले. बदलीबाबतचे संमती पत्र, आदेश स्वयंचलित पद्धतीने निर्माण झाले. या सॉफ्टवेअरने कर्मचार्यांच्या माहितीचे विश्लेषण करून बदल्यांचे नियोजन स्वयंचलितपणे केले, ज्यामुळे मानवी हस्तक्षेप कमी झाला आणि चुका टाळता आल्या.
ही प्रक्रिया केवळ प्रशासकीय सुधारणा नाही, तर कर्मचार्यांच्या कार्यक्षमतेला चालना देणारी आणि महामंडळाच्या उद्दिष्टांना पाठबळ देणारी पायरी आहे. संगणकिकृत सॉफ्टवेअर आणि दूरदृष्य प्रणालीच्या एकत्रित वापराने ही प्रक्रिया केवळ सव्वा तासात पूर्ण करणे शक्य झाले. कार्यालयीन कामकाजात सुद्धा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होत असल्याने कामकाज सुलभ होत आहे.
- लीना बनसोड, व्यवस्थापकीय संचालक, आदिवासी विकास महामंडळ











