जिल्ह्यातील शेतकर्‍यांना परदेशात अभ्यास दौर्‍याची संधी, असा करा अर्ज

नाशिक । जिल्ह्यातील शेतकर्‍यांना परदेश अभ्यास दौर्‍याची संधी मिळणार आहे. त्यासाठी पात्र शेतकर्‍यांनी २३ जुलै पर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अभिमन्यू काशीद यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये केले आहे.

जिल्ह्यातील शेतकर्‍यांना विविध प्रगत देशातील विकसित आणि आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती होण्यासाठी तसेच शेतमालाची निर्यात, कृषी मालाचे पणन व बाजारपेठेतील मागणी, कृषी माल प्रक्रिया याबरोबरच त्या देशांमध्ये उपयोगात येत असलेले अद्ययावत तंत्रज्ञान अवगत करून त्याचा वापर शेतकर्‍यांनी त्यांच्या शेतात करण्यासाठी सहाय करणे, विविध देशांनी विकसित केलेले शेती तंत्रज्ञान व अनुषंगिक बाबी यांची माहिती त्या देशातील शेतकर्‍यांशी प्रत्यक्ष चर्चा करून तसेच क्षेत्रीय भेटी, संबंधित संस्थांना भेटी आदींद्वारे शेतकर्‍यांचे ज्ञान आणि क्षमता उंचावण्यासाठी १६ जून २०२५ च्या शासन निर्णयान्वये राज्य शासनाच्या कृषी विभागांतर्गत शेतकर्‍यांचे देशाबाहेर अभ्यास दौरे राबविण्यात येत आहे.

या अभ्यास दौर्‍यासाठी निवड केलेले संभाव्य देश असे : युरोप- जर्मनी, फ्रान्स, स्वित्झर्लंड, १२ दिवस, फलोत्पादन, सेंद्रीय शेती आणि दुग्धोत्पादन. इस्त्राईल, ९ दिवस, आधुनिक कृषी तंत्रज्ञान, पाणी व्यवस्थापन, कृषी यांत्रिकीकरण. जपान, १० दिवस, सेंद्रीय शेती व आधुनिक कृषी तंत्रज्ञान. मलेशिया, व्हिएतनाम व फिलीपाइन्स, १२ दिवस, फळे, भाजीपाला पिकांचे काढणी पश्चात तंत्रज्ञान आणि व्यवस्थापन प्रणाली. चीन, ८ दिवस, विविध कृषी तंत्रज्ञान, पीक उत्पादकता वाढविण्यासाठी लागणारे तंत्रज्ञान आणि कृषी एक्स्पो. दक्षिण कोरिया, ८ दिवस, आधुनिक कृषी अन्न प्रक्रिया तंत्रज्ञान.

अनुदानाचा तपशील : शासनाकडून अभ्यास दौर्‍यासाठी सर्व घटकांतील (संवर्गातील) शेतकर्‍यांना एकूण खर्चाच्या ५० टक्के रक्कम किंवा जास्तीत जास्त १ लाख यापैकी कमी असेल ती रक्कम अनुदान म्हणून देय राहील.

अभ्यास दौर्‍यासाठी पात्रता
अभ्यास दौर्‍याकरीता जाणारा लाभार्थी हा स्वत: शेतकरी असावा, स्वत:च्या नावे चालू कालावधीचा सातबारा व ८- अ उतारा असणे आवश्यक आहे, शेतकर्‍याचे उत्पन्नाचे मुख्य साधन शेती असावे व त्याने स्वयंघोषणापत्रात नमूद करणे आवश्यक राहील, शेतकर्‍याचे ग्रीस्टॅक अंतर्गत फार्मर आयडी असणे आवश्यक आहे, शेतकरी कुटुंबामधून फक्त एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता येईल. कुटुंबातील इतर सदस्यास सोबत नेण्याची परवानगी राहणार नाही, आधार प्रमाणपत्र आवश्यक, शेतकर्‍याचे वय सहलीला निघण्याच्या दिवशी २५ वर्षे पूर्ण असावे, कमाल वयाची अट नाही, शेतकर्‍याने प्रस्तावासोबत शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र (किमान एमबीएमबीएस डॉक्टरचे) जोडणे आवश्यक राहील.

शेतकरी वैध पारपत्रधारक (पासपोर्ट) असावा, पारपत्राची वैध मुदत दौरा निघण्यापूर्वी किमान तीन महिन्यांपेक्षा जास्त असावी. शेतकरी शासकीय, निमशासकीय, सहकारी, खासगी संस्थेत नोकरीस नसावा, वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर, वकील, सीए, अभियंता आणि कंत्राटदार नसावा. शेतकर्‍याने यापूर्वी शासकीय (केंद्र, राज्य शासनाच्या कोणत्याही विभागामार्फत, कृषी विद्यापीठ, स्थानिक स्वराज्य संस्थामार्फत) अर्थसाहाय्याने विदेश दौरा केलेला नसावा. शेतकर्‍याची अभ्यास दौर्‍यासाठी निवड झाल्याचे पत्र कृषी विभागाकडून मिळाल्यानंतर संबंधित शेतकर्‍याने परदेश दौर्‍यासाठी शारीरिक तंदुरुस्त असल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील. तसेच कोरोना विषयक तपासणी करणे बंधनकारक राहील.

अर्जासमवेत जोडावयाची कागदपत्रे
विहित नमुन्यातील अर्ज, प्रपत्र १, स्वयंघोषणापत्र, वैध पारपत्राची छायांकित प्रत, सातबारा उतारा, ८-अची मूळ प्रत (कालावधी मागील सहा महिने), शिधापत्रिकेची झेरॉक्स प्रत, वैद्यकीय अधिकार्‍याचे मूळ स्वास्थ्य प्रमाणपत्र.

या योजनेंतर्गत इच्छुक शेतकर्‍यांनी २३ जुलै २०२५ पर्यंत जवळच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयात अर्ज सादर करावा. तसेच अधिक माहितीसाठी तालुका कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यातआलेआहे.

error: Content is protected !!