नाशिकमधून मुंबईला होणार भाजीपाला पुरवठा ठप्प ; किती झाला परिणाम ?

नाशिक । गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नाशिकमधून मुंबईला होणारा भाजीपाला पुरवठा ठप्प झाला आहे. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीतून मुंबईला भाजीपाला वाहने पाठवली जातात, मात्र भाजीपाला पुरवठ्याला ब्रेक लागला आहे. त्यामुळे मुंबईच्या किरकोळ बाजारात भाजीपाल्याचे दर गगनाला भिडले आहेत, तर नाशिकच्या बाजारात दर घटले आहेत.

नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर भाजीपाल्याचे उत्पादन घेतले जाते. त्यामुळे नाशिकसह मुंबईच्या अनेक बाजारात नाशिकचा भाजीपाला पोहोचवला जातो. नाशिकच्या वेगवेगळ्या बाजार समित्यांमधून सुमारे २०० वाहनांमधून भाजीपाला मुंबई व उपनगरांमध्ये पाठवला जातो. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीतून मुंबईला दररोज सुमारे २५ ट्रक भाजीपाला पाठवला जातो.

मात्र गेल्या दोन दिवसांपासून केवळ ६ ते ८ ट्रक भाजीपाला जात असल्याचे बाजार समिती सूत्रांनी सांगितले. त्यामुळे नाशिकच्या बाजारात मालाची आवक घटली असून दरही कोसळले आहेत. त्यामुळे खर्चही भरून निघत नसल्याने शेतकर्‍यांनी बाजार समितीत माल आणणे बंद केले आहे.

काही माल हा नाशवंत स्वरूपाचा असून तो बाजारपेठेत आणण्याशिवाय शेतकर्‍यांसमोर पर्याय नाही. मात्र या मालालाही कवडीमोल दर मिळत असल्याने काही शेतकरी तर अक्षरशः भाजीपाला बाजार समिती आवारातच फेकून देत असल्याचे चित्र दिसून येते. पावसामुळे बाजार समितीत दैनंदिन होणार्‍या लाखो रुपयांच्या आर्थिक उलाढालीवर परिणाम झाला आहे.

असा आहे दर
पावसामुळे भाजीपाला निर्यात घटल्याने पालेभाज्या तसेच फळभाज्यांचे दर कोसळले आहेत. यात वांगी २००० रु. प्रति क्विंटल, फ्लॉवर २००० रु. प्रति क्विंटल, कोबी १००० रु. प्रति क्विंटल, ढोबळी मिरची ४३७५ रु. प्रति क्विंटल, भोपळा १३३५ रु. प्रति क्विंटल, कारले १६७० रु. प्रति क्विंटल, दोडके ३३३५ रु. प्रति क्विंटल, गिलके २५०० रु. प्रति क्विंटल, गवार ६००० रु. प्रति क्विंटल, डांगर ६०० रु. प्रति क्विंटल, काकडी २००० रु. प्रति क्विंटल, लिंबू ३५५० रु. प्रति क्विंटल, पेरू २००० रु. प्रति क्विंटल दर मिळत आहे. तर टोमॅटोचे दर वाढले असून सध्या टोमॅटोला सरासरी ४५०० रु. प्रति क्विंटल दर मिळत आहेत.

error: Content is protected !!