नाशिक । नाशिक शहरातील प्रमुख रस्त्यांची अवस्था दिवसेंदिवस अधिकच वाईट होत असून, पावसामुळे पडलेले खड्डे वाहनचालकांसाठी जीवघेणे ठरत आहेत. नाशिक रोड, पंचवटी, नाशिक पूर्व-पश्चिम, सिडको, सातपूर या विभागांत ठिकठिकाणी मोठे खड्डे असून, त्यात पाणी साचल्याने अनेक अपघातांची नोंद झाली आहे.
याच पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) यांनी ‘सेल्फी विथ खड्डा’ हे अभिनव आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाअंतर्गत नागरिकांनी आपल्या परिसरातील खड्ड्यांसमोर ‘सेल्फी’ काढून ती माहिती सोशल मीडियावर #SelfieWithKhadda, #NashikKhaddaAndolan, #SmartCity?, #नाशिकमहानगरपालिका या हॅशटॅगसह पोस्ट करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
हे सर्व फोटो व माहिती संकलित करून नाशिक महानगरपालिकेकडे अधिकृतपणे सादर करण्यात येणार असून, रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत प्रशासनाकडे उत्तरदायित्वाची मागणी करण्यात येईल. शिवसेनेचे उपनेते दत्ता गायकवाड, जिल्हाप्रमुख डी. जी. सूर्यवंशी, महानगरप्रमुख प्रथमेश गीते, माजी आमदार वसंत गीते, राज्य संघटक विनायक पांडे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात येणारआहे.
सर्व प्रभागप्रमुख आणि विभागप्रमुखांना नागरिकांना एकत्र करून सहभाग घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जर लवकरात लवकर खड्डे बुजवण्याची ठोस कारवाई न झाल्यास राजीव गांधी भवनवर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा शिवसेनेच्यावतीने देण्यात आला आहे.











