मुंबई बॉम्बस्फोट प्रकरण – 12 आरोपी निर्दोष

मुंबई : आज, 21 जुलै 2025 रोजी, मुंबई उच्च न्यायालयाने 2006 साली घडलेल्या भीषण लोकल बॉम्बस्फोट प्रकरणात मोठा निकाल दिला. यामध्ये दोषी ठरवण्यात आलेल्या 12 आरोपींना पूर्णपणे निर्दोष ठरवत त्यांची मुक्तता करण्यात आली. या निर्णयामुळे तपास यंत्रणांवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.

घटनाक्रम काय होता?
11 जुलै 2006 रोजी सायंकाळी 6:24 ते 6:35 या अवघ्या 11 मिनिटांमध्ये मुंबईच्या उपनगरी रेल्वे गाड्यांमध्ये सात स्फोट झाले. हे स्फोट चर्चगेट ते बोरिवली मार्गावरील विविध स्थानकांजवळ झाले. या स्फोटांमध्ये 209 नागरिकांचा मृत्यू झाला आणि सुमारे 800 हून अधिकजण जखमी झाले. स्फोटांसाठी कुकर बाँबचा वापर करण्यात आला होता.

2015 मध्ये काय झाला होता निर्णय?
या प्रकरणात विशेष मकोका न्यायालयाने 2015 साली 13 आरोपींपैकी 12 आरोपींना दोषी ठरवले होते. त्यातील 5 जणांना फाशीची आणि 7 जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. दोषी ठरवलेल्यांनी या शिक्षेविरोधात उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते.

आज उच्च न्यायालयाने काय म्हटलं?
आजच्या निकालात उच्च न्यायालयाने स्पष्टपणे नमूद केलं की:

शिक्षा देण्यासाठी ठोस पुरावे सादर करण्यात आले नाहीत.

साक्षीदारांच्या साक्षी विश्वासार्ह वाटत नाहीत.

स्फोटाच्या 100 दिवसांनंतर साक्षीदारांनी आरोपी ओळखणे अशक्य आहे.

स्फोटात वापरलेले बाँब ओळखण्यात तपास यंत्रणा अयशस्वी ठरल्या.

बाँब, बंदुका आणि नकाशे यांच्यात कोणताही ताळमेळ दिसून आला नाही.

या निर्णयामुळे न्यायालयाने तपास यंत्रणांच्या कामगिरीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. न्यायालयाच्या मते, केवळ तर्कशुद्ध किंवा अपूर्ण पुराव्यांवर आधार घेऊन आरोपींना शिक्षा देणे हा अन्याय ठरतो.

सध्या आरोपी कुठे होते?
या निकालाच्या वेळी आरोपी येरवडा, नाशिक, अमरावती आणि नागपूर येथील कारागृहांमधून व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे कोर्टात उपस्थित होते. निकालानंतर त्यांनी आनंद व्यक्त केला.

error: Content is protected !!