मुंबई । लातूर येथे छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. रविवारी (२० जुलै) एका पत्रकार परिषदेत सुरु झालेल्या वादाने हाणामारीचे रूप घेतले आणि यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे काही कार्यकर्ते सहभागी असल्याचा आरोप आहे. छावा संघटनेच्या पदाधिकार्यांवर झालेल्या या हल्ल्यामुळे लातूर शहरात सोमवारी बंद पाळण्यात आला, तर इतर जिल्ह्यांमध्येही आंदोलनाची तयारी सुरू झाली आहे.
या प्रकरणी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी अखेर मौन सोडत X (पूर्वीचे ट्विटर) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, लातूरमधील घटना गंभीर, दुर्दैवी आणि निषेधार्ह आहे. कोणत्याही प्रकारच्या हिंसेला किंवा अश्लाघ्य वर्तनाला पाठिंबा दिला जाणार नाही. आमच्या पक्षाची विचारधारा ही लोकशाही, समता आणि बंधुत्वावर आधारित आहे.
पुढे ते म्हणाले, सामाजिक क्षेत्रात कार्यरत असताना आमच्या सर्व सहकार्यांनी शांतता आणि अहिंसेचे तत्व अंगीकारावे, हीच माझी स्पष्ट भूमिका आहे.
दरम्यान, या प्रकरणात प्रमुख आरोपी ठरलेल्या सूरज चव्हाण यांना अजित पवार यांनी भेटीसाठी बोलावले आहे. सूरज चव्हाण हे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष असून, त्यांच्यासह एकूण १२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे यापुढे पक्षाकडून कोणती कारवाई केली जाते आणि छावा संघटनेची पुढील भूमिका काय असते, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.











