सन २०२० मध्ये कांदा निर्यात धोरणाविरोधात करण्यात आलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. कोविड महामारीच्या काळात केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर निर्बंध लावल्याने महाराष्ट्रातील शेतकर्यांमध्ये तीव्र संताप होता. या निर्णयाविरोधात सदाभाऊ खोत यांनी कांद्याच्या प्रश्नावर आंदोलन केलं होतं. या आंदोलनाच्या वेळी कोव्हीड प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन झाल्याचा आरोप करत पोलीस प्रशासनाने सदाभाऊ खोत आणि त्यांच्या 8 सहकार्यांवर गुन्हा दाखल केला होता.
नाशिक । कोविड काळात बंदीचे सर्व नियम झुगारत कांदा निर्यात धोरणाविरोधात रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांच्यावर लासलगाव येथे गुन्हा नोंदविण्यात आला होता. या प्रकरणी निफाड न्यायालयात सुनावणी सुरू होती. गेल्या आठवडयात सुनावणी पूर्ण होउन निकाल राखून ठेवण्यात आला होता. दरम्यान, सोमवारी न्यायालयाने या प्रकरणी महत्वपूर्ण निकाल दिला आहे.
हे प्रकरण निफाड न्यायालयात गेल्या काही वर्षांपासून सुरू होतं. सर्व पुरावे, साक्षीदारांचे जबाब आणि घटना घडण्याची पार्श्वभूमी यांचा सविस्तर विचार केल्यानंतर न्यायालयाने खोत यांची या प्रकरणातून निर्दोष मुक्तता केली आहे. न्यायाधिश स्नेहा देशपांडे यांच्या बेंचसमोर ही सुनावणी झाली. खोत यांच्यावतीने अॅड. विनोद गुंजाळ यांनी काम पाहिले.
हे आंदोलन शेतकर्यांच्या हक्कांसाठी होतं. आम्ही देशाच्या अन्नदाता वर्गाचा आवाज उठवला होता. न्यायालयाने सत्याला दुजोरा दिला आहे, ही लोकशाहीची विजय आहे.
सदाभाऊ खोत, अध्यक्ष रयत क्रांती सेना








