Mumbai Local : मुंबई लोकलमध्ये होणार मोठा बदल

मुंबई | मुंबईतील लाखो लोकल प्रवाशांमध्ये दररोज सुमारे ५०,००० ज्येष्ठ नागरिकांचा समावेश असतो. गर्दीच्या वेळेस त्यांना होणाऱ्या अडचणींचा विचार करून पश्चिम रेल्वे प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. आता ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र डब्बा उपलब्ध करून देण्यात येणार असून, या उपक्रमासाठी सुमारे ५.४ कोटी रुपयांचा खर्च होणार आहे.

मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार हा निर्णय घेण्यात आला असून, लोकलमधील एक लगेज डब्बा ज्येष्ठ नागरिकांच्या विशेष आरक्षित डब्ब्यात रूपांतरित केला जाणार आहे. सध्या पश्चिम रेल्वेच्या लोकलमध्ये केवळ १४ जागा ज्येष्ठ नागरिकांसाठी राखीव असून, त्या गर्दीच्या वेळेस सहज उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे हा निर्णय महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

रेल्वे बोर्डाने चर्चगेट टोकापासून सातव्या डब्ब्याचा वापर ज्येष्ठ नागरिकांच्या डब्ब्यासाठी करण्यास मान्यता दिली आहे. या डब्ब्यात १३ प्रवाशांसाठी बसण्याची आणि २१ प्रवाशांसाठी उभं राहण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. याशिवाय स्वतंत्र प्रवेशद्वार आणि निर्गमन मार्ग देखील उपलब्ध करून देण्यात येतील.

हा बदल १०५ नॉन-एसी ईएमयू रेक्समध्ये टप्प्याटप्प्याने लागू केला जाणार असून, एक वर्षाच्या आत सर्व रेक्समध्ये हे रूपांतर पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठरवण्यात आले आहे. इतर सामान डब्बे मात्र याप्रमाणेच सुरू राहतील.

मुंबईकर ज्येष्ठ नागरिकांसाठी ही योजना प्रवास अधिक सुरक्षित, सुलभ आणि सन्मानजनक बनवणारी ठरणार असून, नागरिकांमध्ये या निर्णयाचे स्वागत होत आहे.

error: Content is protected !!