मुंबईने मोडला १०७ वर्षाचा इतिहास

मुंबई – महाराष्ट्राची राजधानी मुंबईने यंदा मान्सूनचं ऐतिहासिक स्वागत केलं आहे. २६ मे रोजी मुंबईत दाखल झालेल्या नैऋत्य मान्सूनने विक्रमी पर्जन्यवृष्टीसह १०७ वर्षांतील सर्वाधिक पावसाची नोंद केली आहे. भारतीय हवामान खात्याच्या (IMD) माहितीनुसार, यंदाचा मान्सून मुंबईत नेहमीपेक्षा तब्बल १६ दिवस आधीच दाखल झाला आहे.

कुलाबा वेधशाळेने नोंदवलेल्या आकडेवारीनुसार, सोमवारी मध्यरात्रीपासून सकाळी ११ वाजेपर्यंत २९५ मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली. हा आकडा मे १९१८ मध्ये झालेल्या २७९.४ मिमी पावसाच्या विक्रमापेक्षा अधिक असून, गेल्या १०७ वर्षांतील सर्वाधिक पावसाचा नवा विक्रम ठरतो.

मान्सूनची सर्वात लवकर सुरुवात
भारतीय हवामान खात्याच्या शास्त्रज्ञ सुषमा नायर यांनी सांगितले की, मुंबईत मान्सून सामान्यतः ११ जून रोजी दाखल होतो. २०२४ मध्ये तो ६ जूनला आला होता. मात्र, यंदा तो २६ मे रोजीच दाखल झाल्यामुळे गेल्या ७५ वर्षांतील सर्वात लवकर सुरुवात म्हणून ही नोंद घेतली गेली आहे.

हवामान खात्याचा अलर्ट
पावसामुळे शहरात ठिकठिकाणी पाणी साचले असून वाहतुकीवर परिणाम झाला आहे. याच पार्श्वभूमीवर, आयएमडीने मुंबईसह ठाणे, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे. तसेच कर्नाटक, केरळ, तामिळनाडू आणि इतर दक्षिणेकडील राज्यांतील काही भागांसाठीही इशारे जारी करण्यात आले आहेत.

मान्सूनचा प्रसार
२६ मे रोजी, नैऋत्य मान्सून पुढील भागांमध्ये पोहोचल्याचं हवामान खात्याने जाहीर केलं. मध्य अरबी समुद्राचे काही भाग, महाराष्ट्राचा पश्चिम किनारा व अंतर्गत भाग, दक्षिण भारतातील कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेशचे काही भाग, पूर्व व ईशान्य भारतातील त्रिपुरा, मणिपूर, नागालँड, आसाम, मेघालय व अरुणाचल प्रदेश मान्सूनने व्यापला.

error: Content is protected !!