ITR Filing : करदात्यांसाठी आयकर विभागाने घेतला हा निर्णय

नवी दिल्ली । आर्थिक वर्ष 2025-26 साठी आयकर विवरणपत्र (ITR) भरण्याची अंतिम तारीख वाढवण्यात आली असून, आता करदाते 15 सप्टेंबर 2025 पर्यंत आपलं ITR सादर करू शकणार आहेत. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT) प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही महत्त्वाची माहिती दिली आहे. याआधी ही अंतिम मुदत 31 जुलै 2025 होती.

केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT) ने स्पष्ट केलं की, असेसमेंट वर्ष 2025-26 मध्ये आयटीआर सिस्टममध्ये रचनात्मक बदल आणि सुधारणा सुरू असून, यामुळे एकात्मता, पारदर्शकता आणि अचूकतेला प्राधान्य देण्यात येत आहे. या सुधारणांमुळे प्रणाली तयार करणे, इंटिग्रेशन आणि संबंधित यूटिलिटींची चाचणी करण्यासाठी अतिरिक्त वेळ आवश्यक असल्याने ही मुदतवाढ दिली आहे.

सिस्टममध्ये बदल आणि TDS डेटाचाही परिणाम
करदात्यांची TDS (Tax Deducted at Source) संबंधित माहिती विवरण विंडोतून 31 मे 2025 पर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे. मात्र ती माहिती सिस्टीममध्ये पूर्णपणे परावर्तित होण्यासाठी जूनच्या पहिल्या काही दिवसांची आवश्यकता आहे. त्यामुळे आयटीआर फायलिंगसाठी वेळ कमी पडण्याची शक्यता होती.

या पार्श्वभूमीवर, आयटीआर फायलिंग यूटिलिटी पूर्ण कार्यक्षम होईपर्यंत करदात्यांना त्रास होऊ नये यासाठी आणि रिपोर्टिंगची अचूकता टिकवण्यासाठी ही तातडीची आणि गरजेची मुदतवाढ दिल्याचं CBDT ने स्पष्ट केलं आहे.

स्टेकहोल्डर्सच्या चिंता कमी होणार
CBDT च्या म्हणण्यानुसार, या निर्णयामुळे आयटीआर फायलिंग प्रक्रियेतील स्टेकहोल्डर्सच्या चिंतेला आधार मिळेल, तसेच कम्प्लायन्सच्या दृष्टीने अधिक वेळ मिळेल. या निर्णयामुळे करदात्यांना योजना आखून, नीट माहिती संकलित करून अचूकपणे आणि वेळेत ITR फाईल करता येईल.

नव्या करप्रणालीवर भर
आयटीआर फायलिंग करताना करदात्यांना ‘जुनी करप्रणाली’ व ‘नवी करप्रणाली’ यातील एक निवडावी लागेल. केंद्र सरकारने नव्या करप्रणालीखाली १२ लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त घोषित केले असून, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी यासंदर्भात अर्थसंकल्पात घोषणा केली होती. त्यामुळे करनिवडीपूर्वी सल्लागारांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.

शेवटच्या तारखेची वाट न पाहण्याचे आवाहन
मुदत वाढली असली तरी CBDT ने करदात्यांना शेवटच्या तारखेची वाट न पाहता लवकरात लवकर आयटीआर फाईल करण्याचे आवाहन केले आहे. यामुळे तांत्रिक अडचणी टळतील तसेच करप्रणालीतील भारही कमी होईल.

error: Content is protected !!