नाशिक | नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात सध्या मोठ्या प्रमाणावर नागरिकांना टंचाईचा सामना करावा लागत आहे. आजमितीला जिल्ह्यामध्ये 108 टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. यामध्ये येवला आणि इगतपुरी तालुक्यात सर्वाधिक पाण्याचे टँकर सुरू असल्याची नोंद प्रशासन दफ्तरी करण्यात आली आहे. जलजीवन मिशन सारख्या योजना राबवून देखील नागरिकांना हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे.
या योजनेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत या निषेधार्थ आता थेट पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या मुंबईतील निवासस्थानासमोर हंडा मोर्चा काढण्याच्या इशारा आदिवासी विकास परिषदेचे राष्ट्रीय युवा अध्यक्ष लकी जाधव यांनी दिला आहे.
यंदा तापमानाचा पारा चाळीशीच्या पार गेल्याने उन्हाच्या चटक्यांनी नागरिक हैराण झाले आहेत. ग्रामीण भागात नागरिकांना भीषण पाणीटंचाईला तोंड द्यावं लागत आहे. पिण्याच्या पाण्यासाठी शासनाच्या वतीने
हर घर जल, हर घर नल योजना राबवण्यात आली. जलजीवन मिशन अंतर्गत राबवण्यात आलेल्या या योजनेच्या अनेक तक्रारी आता पुढे येऊ लागल्या आहेत. इगतपुरी तालुक्यात देखील मोठ्या प्रमाणावर ही योजना राबवण्यात आली परंतु अनेक ठिकाणी अद्याप पर्यंत या योजनेचे कामच झालेले नाही, काही ठिकाणी ठेकेदारांनी काम अर्धवट सोडून दिले असल्याच्या तक्रारी आहेत तर अनेक भागात घरात नळ तर पोहोचले परंतु पाण्यासाठी अद्यापही प्रतीक्षाच करावी लागत आहे. ही योजना चुकीच्या पद्धतीने राबवण्यात आल्याच्या तक्रारी आता येऊ लागल्या आहेत . खुद्द अन्न व औषध प्रशासन मंत्री नरेंद्र झिरवाळ यांनी जलजीवन योजना फेल ठरल्याचा आरोप करत सरकारला घरचा आहेर दिला.
इगतपुरी तालुका हा धरणांच्या तालुका मानला जातो. या तालुक्यात सहा ते सात मोठे जल प्रकल्प आहेत. विशेष म्हणजे मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या या तालुक्यातच नागरिकांना टंचाईचा सामना करावा लागतोय. तालुक्यातील धरणांसाठी येथील आदिवासी बांधवांनी आपल्या जमिनी दिल्या मात्र जमिनी देऊ नये याच नागरिकांना आता थेंबभर पाण्यासाठी भर उन्हात वणवन भटकंती करावी लागते.
महाराष्ट्र दिनी कष्टकरी एल्गार संघटनेच्या वतीने मुंबईला जाणारा वैतरणा धरणातील पाणीपुरवठा रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला. आता आदिवासी विकास परिषद मैदानात उतरले असून आदिवासी विकास परिषदेचे राष्ट्रीय युवा अध्यक्ष लकी जाधव यांनी आता थेट पाणीपुरवठा मंत्र्यांच्याच घरावर हंडा मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे. 20 मे रोजी पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या मुंबई येथील निवासस्थानावर मोठ्या स्वरूपाचे आंदोलन करण्यात येणार असल्याचं लकी जाधव यांनी सांगितलं. त्यामुळे आता इगतपुरीतील पाणी प्रश्न पेटणार असे दिसते.
इगतपुरी तालुका हा धरणांच्या तालुका असला तरी धरण उशाला, कोरड घशाला अशा प्रकारची परिस्थिती दिसून येते. या धरणांसाठी तालुक्यातील आदिवासी बांधवांनी आपल्या जमिनी दिल्या. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या इगतपुरी तालुक्यालाच मात्र आता टंचाई परिस्थितीला तोंड द्यावे लागते. तालुक्यामध्ये जलजीवन मिशन योजना राबवण्यात आली परंतु या योजनेत प्रचंड भ्रष्टाचार झालेला आहे आणि या भ्रष्टाचाऱ्यांना येथील अधिकारी आणि लोकप्रतिनिधी पाठीशी घालत आहेत त्यामुळे आता शासनाला जाब विचारण्यासाठी आणि आमच्या हक्काच्या पाण्यासाठी पाणीपुरवठा मंत्र्यांच्या निवासस्थानासमोर हंडा मोर्चा काढण्यात येणार आहे.
लकी जाधव , राष्ट्रीय युवा अध्यक्ष आदिवासी विकास परिषद











