नाशिक । ग्रामीण भागातील नागरिकांची पाण्यासाठी भटकंती रोखण्यासाठी केंद्र शासनातर्फे हर घर नल अभियान राबविण्यात आले. मात्र योजनेंतर्गत घरात नळ तर आले मात्र पाणी आले नाही त्यामुळे पाण्यासाठी सुरू असलेला संघर्ष कायम असून या निषेधार्थ आता महाराष्ट ्रदिनी नाशिकमधून मुंबईला होणारा पाणी पुरवठा रोखण्याचा इशारा कष्टकरी एल्गार संघटनेने दिला आहे. वैतरणा धरणावर हे आंदोलन करण्यात येणार आहे.
आजही इगतपुरीसह ग्रामीण भाग, आदिवासी गावांमध्ये महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. २०२४ पर्यंत प्रत्येक ग्रामीण कुटुंबाला ‘हर घर जल’ हे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. स्वयंपाकासाठी, घरगुती वापरासाठी शुद्ध, सुरक्षित आणि पुरेसा पाणीपुरवठा सर्वकाळ होईल, अशी ग्वाही शासनाने दिली होती. परंतु प्रत्यक्षात अनेक आदिवासी वस्ती, शाळा, अंगणवाड्या याठिकाणी अद्यापही नळाद्वारे पाणी पोहोचलेले नाही.
जल जीवन योजनेतून कामे सुरू असली तरी ती केवळ कागदावर मर्यादित आहेत. ही योजना पुर्णत्वास नेण्यास सरकार अपयशी ठरले असल्याचा आरोप संघटनेकडून करण्यात आला. एल्गार कष्टकरी संघटनेने केंद्र आणि राज्य सरकारच्या या ढिसाळ कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त करत, जर लवकरात लवकर जल जीवन मिशन प्रभावीपणे राबवण्यात आले नाही, तर मुंबईला पाणीपुरवठा रोखण्यास आम्ही भाग पडू, असा स्पष्ट इशारा दिला आहे.जर शहरी भागासाठी सर्व सुविधा तत्परतेने मिळू शकतात, तर आदिवासी आणि ग्रामीण जनतेसाठी दुर्लक्ष का?”, असा प्रश्न एल्गार कष्टकरी संघटनेने उपस्थित केला आहे.
या आहेत मागण्या
प्रत्येक घराला दररोज किमान ५५ लिटर स्वच्छ पाणी मिळावे. प्रत्येक शाळा, अंगणवाडी आणि सार्वजनिक ठिकाणी थेट नळजोडणी मिळावी. वीज नसलेल्या आदिवासी पाड्यांवर सौर ऊर्जेवर आधारित पाणीपुरवठा योजना त्वरीत सुरू कराव्यात. जल जीवन मिशन अंतर्गत सर्व भागांत पारदर्शक आणि वेळेत कामे पूर्ण होणे आवश्यक आहे.











