इगतपुरी – इगतपुरी तालुक्यातील वैतरणा धरणातून मुंबईकडे होणार्या पाणीपुरवठ्याला रोखण्यासाठी एल्गार कष्टकरी संघटनेच्या पदाधिकार्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. स्थानिक आदिवासी पाड्यांमध्ये दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या पाण्याच्या प्रश्नाकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलकांनी थेट धरणाच्या पाण्यात उडी मारत जलआंदोलन छेडले.या आंदोलनात महिलांचा देखील लक्षणीय सहभाग पाहायला मिळाला.
ग्रामीण भागात घराघरात नळाने पाणी पोहोचविण्याच्या केंद्र शासनाच्या जल जीवन मिशन योजनेच्या अंमलबजावणीत गंभीर त्रृटी आणि प्रशासनाच्या निष्क्रियतेचा निषेध करत एल्गार कष्टकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भगवान मेधे यांनी महाराष्ट्र दिनी मुंबईचा पाणी पुरवठा रोखण्याचा इशारा दिला होता. नाशिक जिल्हयातील अनेक तालुक्यांमध्ये टंचाई परिस्थिती गंभीर आहे.
विशेष म्हणजे धरणांचा तालुका म्हणून ओळख असलेल्या इगतपुरी तालुक्यात नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. तालुक्यातील ग्रामीण भागात जल जीवन मिशन अंतर्गत नळ बसवण्यात आले मात्र अद्याप या नळांना पाणीच आलेले नाही. त्यामुळे नागरीकांमध्ये संताप आहे. इगतपुरी तालुक्यात सहा ते सात मोठे जलप्रकल्प आहेत. विशेष म्हणजे मुंबईला पाणी पुरवठा या तालुक्यातील वैतरणा धरणातून केला जातो. मुंबईची तहान भागवणारा तालुकाच मात्र टंचाईच्या गंभीर परिस्थितीला तोंड देत आहे. याचा निषेध कष्टकरी एल्गार परिषदेने केला.
वारंवार निवेदनं देऊनही आमच्या पाड्यांना पाणी मिळत नाही. आमच्या मुलाबाळांना पिण्याच्या पाण्याची वानवा भासत असताना मुंबईला लाखो लिटर पाणी पुरवले जाते, असा संताप आंदोलकांनी व्यक्त केला.जलजीवन मिशनच्या कामात होणार्या अनियमिततेची चौकशी करण्याची मागणी आंदोलकांनी केली असून, या योजनेतून स्थानिकांना अपेक्षित लाभ मिळाला नसल्याचा आरोपही त्यांनी केला.
या आहेत मागण्या
प्रत्येक घराला किमान ५५ लिटर स्वच्छ पाणी मिळावे
शाळा, अंगणवाडी आणि सार्वजनिक ठिकाणी नळजोडणी मिळावी
आदिवासी पाडयांवर सौर उर्जेवर आधारित पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करावी
जल जीवन मिशन योजनेची कामे वेळेत पूर्ण करावीत
“जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार आहे,” असा ठाम इशारा आंदोलकांनी दिला आहे. प्रशासनाने तातडीने लक्ष घालून योग्य निर्णय न घेतल्यास मुंबईच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होऊ शकतो, असा गंभीर इशाराही त्यांनी दिला आहे.











