नाशिक । नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सक्तीच्या कर्जवसुली विरोधात तसेच कर्जमाफीसाठी शेतकरी संघटनेने श्रीरामाच्या चरणी नतमस्तक होत प्रार्थना केली. यावेळी काळाराम मंदिराच्या प्रवेशव्दारावर आंदोलन करण्यात आले. श्रीरामाच्या नावाने निवडून आलेल्या सरकारला बुद्धी यावी अशी प्रार्थना शेतकर्यांनी या वेळी केली.
शेतकरी समन्वय समितीचे भगवान बोराडे यांच्यासह शेतकर्यांनी श्री काळाराम मंदिराच्या प्रवेशव्दारावर आंदोलन करण्यात आले. जिल्हा बँकेकडून कर्जवसुलीसाठी सक्तीची कर्जवसुली मोहिम सुरू केली आहे. जिल्ह्यात सुमारे ५६ हजार शेतकर्यांवर कर्जवसुलीची कारवाई सुरू असून हजारो शेतकर्यांच्या सातबारा उतार्यावर बँकेचे नाव लावण्यात येत आहे.
मध्यंतरी कृषीमंत्री अॅड. माणिकराव कोकाटे यांनी कर्जवसुलीला तीन महिने स्थगिती देण्याचा निर्णय घेतला तसेच कर्ज वर्गवारीनूसार व्याजदरात सवलत देण्याचा मुददाही पुढे आला. परंतू शेतकरी वर्गाकडून या निर्णयाला विरोध करत कर्जमाफीची मागणी केली आहे तसेच सक्तीची कर्जवसुली मोहिम थांबविण्याची मागणी देखील करण्यात आली आहे.
आज सीता नवमी असल्याने शेतकर्यांनी पंचवटीतील श्री काळाराम मंदिरात धाव घेत श्रीरामा चरणी प्रार्थना करत कर्जमाफीची मागणी केली. या आंदोलनात शेतकरी समन्वय समितीचे कैलास बोरसे, दनाजी अहिरे, दिलीप पाटील, रामदास राऊत, जयवंत राऊत, ताराबाई ठाकरे, रामचंद्र गायकवाड, मुरलीधर ठाकरे, गंगाधर शिंदे यांच्यासह अनेक शेतकरी सहभागी झाले होते.
जर ही कारवाई थांबवण्यात आली नाही, तर आगामी काळात जिल्हा बँकेवर तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा शेतकरी संघटनांनी दिला आहे.







