‘या’ महामंडळामार्फत मिळणार गृहकर्ज

नाशिक । आपल्या हक्काचं घर असावं असे प्रत्येकाचेच स्वप्न असते. मात्र दिवसेंदिवस वाढत जाणारा घरांच्या किंमती, गृह कर्ज मिळविण्यात येणारया अडचणी पाहता अनेकांचे हे स्वप्न स्वप्नच राहून जातं परंतू राज्यात स्थापन करण्यात आलेल्या आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून आता घराचं स्वप्न पूर्ण करणं अगदी सहज शक्य झाले आहे. जैन अल्पसंख्याक विकास महामंडळ आता याकरीता गृहकर्ज उपलब्ध करून देणार असून जैन बांधवांना आता ३ ते ६ टक्के दराने गृहकर्ज उपलब्ध होणार आहे. याकरीता महामंडळाने काही निकषही लागू केले आहेत.


महामंडळाचे अध्यक्ष गांधी म्हणाले की, महामंडळामार्फत समाजाचे सर्व्हेक्षण करण्यात येत आहे. समाजातील आर्थिक दुर्बल घटकांच्या सक्षमीकरणासाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत. विद्यार्थ्यांना शिक्षणाकरीता तसेच परदेशी शिक्षणाकरीता महामंडळामार्फत कर्ज उपलब्ध करून देण्यात येईल.

काही कुटुंबांकडे स्वतःचे घरही नाही. अशा गरजू व्यक्तींना अल्पसंख्यांक महामंडळातर्फे अल्पदरात कर्ज, शिक्षण सवलती तसेच उपजीविकेसाठी आर्थिक मदत देण्यात येणार आहे. समाजातील आर्थिक दुर्बल घटाकांचे सर्वेक्षण करण्यात येऊन अशा कुटूंबांना गृहकर्ज उपलब्ध करून देण्यात येणार असून अशा प्रकारे महामंडळाच्या माध्यमातून प्रथमच गृहकर्ज देण्याचा निर्णय शासनाने घेतल्याचे त्यांनी सांगितले.

जैन मराठी विश्वकोशाची स्थापना
केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे. जैन समाजाच्या प्राचीन ग्रंथसंपदेचा मराठी भाषेत प्रचार-प्रसार व्हावा, यासाठी ‘जैन मराठी विश्वकोश’ स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सदानंद मोरे व संजय सोनवणे यांचा या उपक्रमात सहभाग असणार असून तीन वर्षांत पहिला खंड प्रसिद्ध करण्याचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले.

दोनशे कोटींची तरतूद
महामंडळासाठी राज्य सरकारने २०० कोटी रूपयांची तरतूद केली असून या माध्यमातून शैक्षणिक, उद्योगासाठी तसेच गृहकर्ज दिले जाणार आहे. या कर्जाचा दर ३ ते ६ टक्क्यांपर्यंत असणार आहे. १ मे महाराष्ट्रदिनी महामंडळाच्या संकेतस्थळाचे अनावरण करण्यात येणार असून सर्व योजनांसाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येतील असे गांधी यांनी सांगितले.

error: Content is protected !!