मुंबई । राज्य सरकारच्या ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेला मिळालेला उदंड प्रतिसाद लक्षात घेता, आता या योजनेतून लाभार्थी ठरलेल्या महिलांसाठी आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई बँकेकडून या महिलांना आता शून्य टक्के व्याजदराने 1 लाख रुपयांपर्यंत कर्ज दिलं जाणार आहे. यामुळे महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी मोठा आर्थिक आधार मिळणार आहे.
बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, लाडकी बहीण योजनेतून जोडलेल्या महिलांना उद्योजिका म्हणून सक्षम करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी महिलांना 9 टक्के व्याजदराने कर्ज दिलं जात होतं, मात्र आता चार महामंडळांच्या योजना समन्वयातून व्याजाचा परतावा महामंडळांकडून मिळवण्यात येणार असल्याने महिलांना प्रत्यक्षात शून्य टक्के दराने कर्ज मिळू शकणार आहे.
या चार महामंडळांचा सहभाग
अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ
भटक्या व विमुक्त जातींसाठीचे महामंडळ
ओबीसी महामंडळ
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (आई योजना)
या योजनांमधून लाभार्थी महिलांना १२ टक्क्यांपर्यंत व्याज परतावा मिळतो. त्यामुळे जर महिला या योजनेच्या पात्रतेत बसत असतील, तर त्यांना शून्य टक्के व्याजदराने कर्ज मिळू शकते.
अशी आहे कर्ज प्रक्रिया
महिलांनी मुंबई बँकेत कर्जासाठी अर्ज केल्यास व्यवसायाच्या स्वरूपाची तपासणी केली जाईल. त्यानंतर पात्र महिलांना १ लाख रुपयांपर्यंत कर्ज दिलं जाईल. एकाच व्यवसायासाठी ५ ते १० महिला मिळूनही कर्ज घेऊ शकतात.
लाडकी बहीण योजनेचा विस्तार
सध्या मुंबईत १२ ते १३ लाख महिला ‘लाडकी बहीण’ योजनेत नोंदणीकृत आहेत. यापैकी जवळपास १ लाख महिला मुंबई बँकेच्या सभासद आहेत. या महिलांना प्राथमिक टप्प्यात हा लाभ दिला जाणार आहे. प्रवीण दरेकर यांनी स्पष्ट केलं की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून, यामुळे महिलांचा आर्थिक सशक्तीकरणाचा मार्ग अधिक सुलभ होईल.







