मुंबई । महाराष्ट्रातील महसूल विभागातील कर्मचार्यांसाठी शासनाने मोठा निर्णय घेतला आहे. यापुढे तलाठ्यांपासून ते उपजिल्हाधिकार्यांपर्यंत सर्व कर्मचार्यांना दररोज कार्यालयात उपस्थिती नोंदवणे बंधनकारक करण्यात आले आहे. ही उपस्थिती ‘फेस अॅप’ आणि ‘जिओ-फेन्सिंग’ प्रणालीद्वारे नोंदवावी लागणार आहे.
महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही माहिती दिली. ऑगस्ट महिन्याच्या वेतनासाठी फेस अॅपवर नोंदणी आवश्यक आहे. शासन लवकरच याबाबतचा अधिकृत आदेश जारी करणार आहे. नोंदणी न केल्यास त्या दिवशी कर्मचार्याची अनुपस्थिती म्हणून नोंद होईल. त्यामुळे, संबंधित कर्मचार्याला वेतनही मिळणार नाही. या प्रणालीमुळे कर्मचार्यांना प्रत्यक्ष कार्यालयात उपस्थित राहावे लागणार आहे.
राज्यातील महसूल विभागात पारदर्शकता आणि शिस्त आणण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार राज्य सरकारने ही प्रणाली लागू केली आहे. रायगड जिल्ह्यात महसूल विभागाच्या आढावा बैठकीदरम्यान या निर्णयाची घोषणा करण्यात आली.
नोंदणी न केल्यास गैरहजेरी
तलाठी ते उप जिल्हाधिकार्यांपर्यंत सर्वांनाच ‘फेस अॅप’वर नोंदणी बंधनकारक असून ज्या गावात नोकरी आहे, तिथे जात उपस्थिती लावावी लागेल. तसेच, महसूल कर्मचार्यांची आता त्यांच्या कार्यालयात उपस्थिती आवश्यक असणार आहे. तर, नोंदणी न केल्यास त्या दिवशी उपस्थिती नाही, असे समजण्यात येईल. त्यामुळे तलाठी ते उपजिल्हाधिकार्यांपर्यंत सर्वच महसूल कर्मचार्यांना कार्यालयात दररोज यावे लागणार आहे.










