नाशिक । नाशिक जिल्ह्यामधून मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या सोबत लाखो मराठा समाजबांधव मुंबई येथे मराठा आरक्षणासाठी न्यायिक लढा देत आहेत.या समाजबांधवांची जेवणाची व्यवस्था कुठेही कमी पडू नये म्हणून आज नाशिक जिल्ह्यातील विविध तालुके व शहरातून तब्बल २० पिकअप अन्नसामग्री पाठविण्यात येत आहे.
चपाती-भाकरी,ठेचा,लोणचं, पाण्याच्या बाटल्या,राजगिर्याचे लाडू,बिस्किटे,चिवडा,भत्त्याचे पाकीट यांसारखी आवश्यक सामग्रीचा समावेश असून, साधारण ५० हजार लोकांचे जेवण होईल इतकी व्यवस्था नाशिक जिल्ह्याच्या वतीने करण्यात येत आहे.
कालिका माता मंदिर या ठिकाणी दिंडोरी,नाशिक ग्रामीण तालुक्यातील गिरणारे, मखमलाबाद,दुगाव,दरी तसेच नाशिक रोड,सिन्नर,येवला या भागातून विविध गाव-खेड्यातून या गाड्या जमा झाल्या होत्या.या सर्व गाड्यांना एकत्रित करत शहरातील जमा झालेले कालिका मंदिर येथील साहित्य सदरील गाड्यांमध्ये पाठवण्यात येत आहे.
जिल्ह्यातील मराठा समाज बांधव करण गायकर,नानासाहेब बच्छाव, केशव अण्णा पाटील,विलास पांगरकर,नितीन सुगंधी,भारत पिंगळे,राम खुर्दळ,नितीन थेटे, योगेश नाटकर पाटील आदींसह समाज बांधव याचे नियोजन करत आहे.
ज्या समाज बांधवांना मुंबई येथील आंदोलनासाठी बिस्किट, राजगिर्याचे लाडू,बिसलरी बॉक्स,चिवडा,भत्ता,कोरडा शिधा पाठवायचा असेल त्यांनी मुंबई नाका येथील कालिका माता मंदिर येथे जमा करावा.आपली मदत आपल्या समाज बांधवांच्या आंदोलनाला निश्चित ताकद देईल. कारण ही लढाई मराठा योद्धा जरांगे पाटलांनी अंतिम केलेली असून,यासाठी आपण सर्वजण आपल्या परीने होईल ती मदत करून आंदोलनात आपला सहभाग नोंदवावा.
करण गायकर,मराठा क्रांती मोर्चा राज्य समन्वयक










