ओला, उबर, रॅपिडोच्या भाडेदरात दुप्पट वाढ

मुंबई । रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने 1 जुलैपासून नव्या मार्गदर्शक तत्वांची अंमलबजावणी केली असून, ओला, उबर, रॅपिडो सारख्या अ‍ॅप आधारित सेवांना गर्दीच्या वेळेत मूळ भाड्याच्या दुप्पट रक्कम आकारण्याची परवानगी देण्यात आली आहे. यापूर्वी दीडपट भाडं आकारण्याची मुभा होती.

या नव्या नियमांनुसार गर्दी नसलेल्या वेळेत कॅब चालकांना किमान ५० टक्के मूळ भाडं आकारणे बंधनकारक करण्यात आलं आहे. याशिवाय, प्रवासी नसताना चालवलेल्या अंतरासाठी व प्रवाशांना घेण्यासाठी कापलेल्या अंतरासाठी “डेड मायलेज” भरून काढण्यासाठी किमान तीन किलोमीटरचं मूळ भाडं आकारलं जाणार आहे.

हा निर्णय देशभरातील राज्यांना पुढील तीन महिन्यांत लागू करण्याची सूचना देण्यात आली आहे, त्यामुळे या कालावधीत ओला-उबर सेवा महागण्याची शक्यता आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात बाईक टॅक्सी सेवा देणार्‍या रॅपिडोवर वाद निर्माण झाला आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले की, राज्यात बाईक टॅक्सी सेवेला परवानगी न देता देखील रॅपिडो सेवा सुरू आहे. मंत्री सरनाईक यांनी स्वतः रॅपिडो बाईक बुक करून सेवा तपासली असून, कोणत्याही नियमांचे पालन न करता ही सेवा सुरू असल्याचे स्पष्ट केलं आहे. त्यामुळे संबंधित कंपन्यांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

सरनाईक म्हणाले, ड्रायव्हरवर गुन्हा दाखल करण्यापेक्षा कंपनीवर कारवाई झाली पाहिजे. चुकीच्या गोष्टींना सरकार पाठीशी घालणार नाही. स्थानिक रिक्षा व टॅक्सी चालकांमध्ये यामुळे नाराजीचं वातावरण असून, पारंपरिक सेवा देणार्‍यांवरही समान नियम लागू करण्यात येतील, असं परिवहन मंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे.

error: Content is protected !!