नवी दिल्ली – केंद्रीय पर्यावरण मंत्रालय एसीच्या वापराबाबत नियमावली आणण्याच्या तयारीत असल्याचे सांगितले जात होते मात्र पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी स्पष्ट केले आहे की भारतात एअर कंडिशनर (एसी) च्या तापमान मर्यादेबाबत त्वरित कोणतेही कठोर नियम लागू होणार नाहीत. इंडिया क्लायमेट समिट (ICS) 2025 दरम्यान बोलताना त्यांनी सांगितले की, 20 ते 28 अंश सेल्सिअस या मर्यादेत एसी वापरासाठी आवश्यक ती यंत्रणा कालांतराने विकसित केली जाईल.
यादव म्हणाले, मला वाटत नाही की हे लगेच शक्य होईल. हळूहळू त्यासाठी क्षमता निर्माण केली जाईल. हवामान बदलासंदर्भातील राष्ट्रीय उद्दिष्टे साध्य करताना ‘सामान्य परंतु भिन्न जबाबदार्या आणि संबंधित क्षमता’ (CBDR-RC) या जागतिक तत्त्वानुसार पुढे जाणे गरजेचे आहे.
या महिन्याच्या सुरुवातीला केंद्रीय मंत्री मनोहर लाल यांनी जाहीर केले होते की भारतात लवकरच एसीचे तापमान 20 ते 28 अंश सेल्सिअसच्या मर्यादेत असणे बंधनकारक करण्यात येईल. ही घोषणा ऊर्जा बचतीसाठी महत्त्वाची मानली जात आहे.
ऊर्जा कार्यक्षमता ब्युरो (BEE) ने यापूर्वीच सुचवले आहे की एसीचा आदर्श वापर 24 ते 25 अंश सेल्सिअस दरम्यान असावा. सध्या भारतातील बहुतेक एसी 20 ते 21 अंशांवर चालू असतात, जे ऊर्जेचा मोठ्या प्रमाणावर अपव्यय करतात. BEE च्या मते, एसीचे तापमान प्रत्येक अंशाने वाढवल्यास सुमारे 6 टक्के वीज वाचवता येते.
कॅलिफोर्निया विद्यापीठाच्या इंडिया एनर्जी अँड क्लायमेट सेंटर (IECC) च्या अभ्यासानुसार, भारतात दरवर्षी 1 ते 1.5 कोटी नवीन एसी जोडले जात आहेत. पुढील दशकात ही संख्या 13 ते 15 कोटीपर्यंत पोहोचू शकते. धोरणात्मक बदल न केल्यास 2030 पर्यंत एसीमुळे एकट्या 120 गिगावॅट वीजेची मागणी वाढू शकते.
तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, ऊर्जा कार्यक्षमतेत सुधारणा करून भारत केवळ ऊर्जा टंचाई टाळू शकतो असे नाही, तर ग्राहकांचे सुमारे 2.2 लाख कोटी रुपयेही वाचवू शकतो.











