नाशिक । शहरातील नांदुरनाका परिसरात एका पीक-अप वाहनाचा रस्त्यावर अपघात झाला. नेमकं त्याच वेळी या मार्गावरून राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांचा ताफा जात होता. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी क्षणाचाही विलंब न करता आपला ताफा थांबविला आणि अपघातग्रस्ताला मदत करण्यासाठी पुढाकार घेतला.
मंत्री भुजबळ यांनी यावेळी माणूसकीचे दर्शन घडवतांना आपल्या कर्मचार्यांना लागलीच मदतीसाठी धाडले. भुजबळ यांच्या ताफ्यातील पोलिस व इतर कर्मचार्यांनी तात्काळ पीक-अप गाडीत अडकलेल्या चालकाला सुरक्षितपणे बाहेर काढले आणि रस्त्यावर अडथळा ठरत असलेली गाडी बाजूला केली. भुजबळ यांनी स्वतः अपघातग्रस्त व्यक्तीची विचारपूस करत त्याच्या प्रकृतीबाबत माहिती घेतली.
अपघातानंतर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती, मात्र पोलिसांच्या मदतीने ती लगेचच सुरळीत करण्यात आली. नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देणारी ही कार्यपद्धती आणि तात्काळ प्रतिसाद देण्याची भुजबळ यांची संवेदनशीलता यामुळे उपस्थितांनी त्यांचे आभार मानले. भुजबळ यांनी नागरीकांशी चर्चा करतांना या मार्गावरील वाहतूकीबाबत माहीती जाणून घेतली.
छगन भुजबळ हे केवळ एक मंत्री म्हणून नव्हे, तर सामाजिक जाणीवा असलेले नेते म्हणून ओळखले जातात. यापूर्वीही त्यांनी अनेकदा नाशिक मुंबई प्रवासा दरम्यान अपघातग्रस्तांना मदत केल्याचे दिसून आले होते.











