मुंबई | सततची अतिवृष्टी आणि पूर यामुळे राज्यात अस्मानी संकट उभे राहिले आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना मदतीसाठी राज्य सरकारने थेट केंद्रीय मंत्री अमित शहा यांना पत्र लिहीत एनडीआरएफ च्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी मदतीसाठी अनुदान द्यावे अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे . या संदर्भात देवेंद्र फडणवीस हे आता दिल्ली दौऱ्यावर राहणार असून या दौऱ्यात शेतकरी मदती संदर्भात मोठा निर्णय होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
गेला काही दिवसांपासून सातत्याने झालेल्या अतिवृष्टीमुळे मराठवाड्यासह सर्वत्र पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्याच्या अनेक भागात पूर परिस्थिती निर्माण झाली असून शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.अनेकांची घरंही उध्वस्त झाले आहेत.
महायुती सरकारच्या मंत्र्यांनी शेत बांधावर जाऊन आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. तर विरोधकांकडून ओला दुष्काळा जाहीर करण्याची मागणी होत आहे. केवळ राज्यानेच नाही तर केंद्राने ही मदतीसाठी विशेष पॅकेज जाहीर करण्याची मागणी देखील आता विरोधकांकडून करण्यात येत आहे.
पूरग्रस्त 31 लाख 64 हजार शेतकऱ्यांसाठी सरकारने मंत्रिमंडळ बैठकीत 2215 कोटी रुपयांची मदत जाहीर केली. ही मदत दिवाळीपूर्वी देण्यात येणार आहे पण सरकारची ही मदत पुरेशी नसून पुढील काळात पावसाचा जोर कायम राहिल्यास मदतीची रक्कम वाढवावी लागणार आहे.
दरम्यान,राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय मंत्री अमित शहा यांना पत्र लिहीत राज्यातील एकूणच परिस्थितीबाबत अवगत केले आहे. त्याचप्रमाणे SDRF मधून राज्य सरकारने 2215 कोटी रुपयांची मदत शेतकऱ्यांना केली असून केंद्र सरकारने देखील NDRF च्या माध्यमातून राज्य सरकारला मदत करावी अशी मागणी मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली आहे.
या संदर्भात आता देवेंद्र फडणवीस हे शनिवारी दिल्ली दौऱ्यावर जाणारा असून या दौऱ्यात ते अमित शहा यांची भेट घेऊन राज्यातील एकूणच परिस्थिती संदर्भात त्यांच्याशी चर्चा करणार आहे. त्यामुळे आता या भेटीनंतरच शेतकऱ्यांच्या मदती संदर्भातला एक मोठा निर्णय होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.









