अवकाळीग्रस्तांसाठी विशेष आर्थिक पॅकेज द्या

छावा क्रांतीवीर सेनेचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

नाशिक । गेल्या दोन दिवसांपासून नाशिक जिल्ह्यासह अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वार्‍यासह अवकाळी पावसाचा जोर सुरू असून शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे.विशेषतः नाशिक,त्र्यंबकेश्वर, इगतपुरी,निफाड,मालेगाव,सटाणा,नांदगाव,कळवण,दिंडोरी, सुरगाणा,पेठ,सिन्नर,चांदवडतालुक्यांतील अनेक गावांमध्ये अवकाळी पावसामुळे वादळी वार्‍याचे आणि काही भागांतील गारपिटीचे मोठे संकट ओढावले आहे.


या आपत्तीमुळे अनेक ठिकाणी शेतीमाल पूर्णतःनष्ट झाला आहे.आधीच बाजारात योग्य दर मिळत नसताना,तोंडाशी आलेली पिकेही या संकटात खराब झाली आहेत.फक्त शेतीच नव्हे तर पोल्ट्री फार्म,बकरी पालन,तसेच गाई-म्हशींचे गोठेही वादळात उध्वस्त झाले असून शेतकर्‍यांवर आर्थिक संकट कोसळले आहे. या पार्श्वभूमीवर छावा क्रांतीवीर सेनेने जिल्हा प्रशासनाला निवेदन काही मागण्या केल्या आहेत. शेतकर्‍यांना तात्काळ आणि अधिकाधिक मदत मिळेल अशा उपाययोजना कराव्यात.


जर शासनाने या मागण्यांकडे तात्काळ लक्ष दिले नाही,तर छावा क्रांतिवीर सेनेच्या वतीने मोठे जनआंदोलन उभे करण्यात येईल असा इशाराही यावेळी देण्यात आला. यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर,शिवा तेलंग,नवनाथ शिंदे, आशिष हिरे,प्रवीण पाटील,आबा पाटील, वैभव दळवी, शुभम महाले,ज्ञानेश्वर पालखेडे,सागर जाधव,अमोल देवरे, दत्ताजी पवार,राकेश पाटील,प्रवीण बिल्याणी,जयेश मोरे,भगवान घुगे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

या आहेत मागण्या
नुकसानग्रस्त शेतकर्‍यांच्या पिकांचे पंचनामे तात्काळ करावे
शेतकर्‍यांच्या बांधावर जाऊन नुकसानीचा अहवाल तयार करावा.
शेतीसोबतच पशुपालन,पोल्ट्री व इतर व्यवसायांचेही पंचनामे करावे
नुकसाग्रस्तांसाठी आर्थिक मदतीची घोषणा करावी.
शासनाने शेतकर्‍यांसाठी विशेष आर्थिक पॅकेज जाहीर करावे.

प्रतिक्रिया
नाशिक जिल्ह्यासह महाराष्ट्रात अवकाळी पावसाने दोन दिवसापासून थैमान घालून प्रचंड मोठ्या प्रमाणात शेतकर्‍यांच्या पिकांचे अतोनात नुकसान केले आहे. अवकाळीने कांदा, आंबा, गहू, टोमॅटो, डाळिंब, द्राक्ष यांसह अनेक फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केल्यामुळे राज्य शासनाने तात्काळ शेतकर्‍यांना विशेष पॅकेज घोषित करून आर्थिक मदत करावी. बळीराजाला या अस्मानी संकटातून बाहेर काढण्यासाठी शासनाने सर्वतोपरी मदत करून शेतकर्‍यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे अन्यथा संघटनेच्या वतीने या विरोधात राज्यभर आंदोलन करून शासनाला मदत करण्यास भाग पाडू.
करण गायकर संस्थापक अध्यक्ष – छावा क्रांतिवीर सेना महाराष्ट्र राज्य

error: Content is protected !!