लाडकी बहिण योजनेनंतर आता मंत्री झिरवाळांचा या योजनेवर आक्षेप

नाशिक । लाडक्या बहिणींना २१ रूपये देण्याचे कोणीही जाहीर केलेले नाही असे वक्तव्य करणारे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री नरहरी झिरवळ चर्चेत आले आहे. त्यांच्या या वक्तव्यावर आता विरोधकांकडून आरोप होऊ लागले आहेत. त्यामुळे महायुती सरकार पुन्हा एकदा कोंडीत सापडले आहे. मात्र, आता झिरवळ यांनी पुन्हा एकदा केंद्राच्याच योजनेवर आक्षेप घेतल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

नाशिक जिल्ह्यात वाढत्या उष्णतेमुळे व पाणीटंचाईच्या प्रश्नावर आमदार नरहरी झिरवाळ यांनी चिंता व्यक्त केली आहे. गेल्या २ ते ३ वर्षांपासून उष्णतेत मोठ्या प्रमाणात वाढ होत असून, ज्या गावांमध्ये पूर्वी पाणीटंचाईची शक्यता नव्हती, तिथेही आता गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे, असे त्यांनी सांगितले.झिरवाळ यांनी स्पष्ट केले की त्यांच्या मतदारसंघातील अनेक भागांत मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई जाणवत आहे. बोरीचीवाडीसह एकूण २३ गावांमध्ये पाणीपुरवठ्याची मोठी अडचण निर्माण झाली आहे. टँकरद्वारे पाणीपुरवठा करतानाही समस्या उद्भवत आहेत. शासनाचे सध्या माणशी २० लिटर पाणी देण्याचे निकष आहेत, परंतु ते बदलण्याची गरज आहे, कारण घरांमध्ये जनावरेही आहेत आणि त्यांनाही पाणी आवश्यक आहे, असे त्यांनी नमूद केले.

झिरवाळ यांनी जलजीवन मिशन योजनेवरही टीका केली. ही योजना अद्याप पूर्ण झाली नाही आणि केंद्र सरकारनेदेखील ही योजना चुकीच्या पद्धतीने राबवली असल्याचे मान्य केले आहे, असे ते म्हणाले. योजना आखताना बेस तपासल्याशिवाय काम सुरू करू नये, असेही त्यांनी सुचवले. त्यांच्या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात जंगल क्षेत्र असल्याने बंधारे बांधण्यात अडचणी येतात आणि त्यामुळे पाणी जमिनीत मुरवता येत नाही, असेही त्यांनी सांगितले.

लाडक्या बहिणींना पाच हजार द्या
‘लाडकी बहीण’ योजनेवर बोलताना झिरवाळ म्हणाले, १५०० व २१०० रुपये हे काही अचानक झालेले नाही. जर सरकारने ५ हजार रुपये दिले तरी आमच्याकडून काही विरोध होणार नाही. मात्र आर्थिक परिस्थिती पाहूनच निर्णय घ्यावा लागतो. विकासकामांना अडथळा येऊ नये म्हणून उत्पन्न व खर्च यांचे योग्य नियोजन गरजेचे आहे, असे ते म्हणाले. ही योजना कोणीही बंद करू शकत नाही, असा ठाम विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

कोणी म्हणे मी नाटकी
नुकत्याच चर्चेत आलेल्या हेलिकॉप्टर व्हिडिओवरही झिरवाळ यांनी स्पष्टीकरण दिले. पहिल्यांदा हेलिकॉप्टर त्या ठिकाणी आले होते. माझ्या लहानपणापासूनचा मित्र असल्यामुळे मी त्याला हेलिकॉप्टर दाखवले. कोणी म्हणते मी नाटकी आहे, तर कोणी म्हणते देव आहे. पण मी माझ्या मनाप्रमाणे वागत असतो, असे झिरवाळ यांनी स्पष्ट केले.

error: Content is protected !!