मुंबई । मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेंतर्गत महिलांना दरमहा १५०० रूपये देण्यात येतात. परंतू आता या योजनेत काही सरकारी कर्मचारी तसेच लाडक्या भावांनी बहीणींच्या नावे अनुदान लाटल्याचे समोर आले. त्यामुळे आता या योजनेसाठी राज्य शासनाकडून काही निकष लावण्यात येणार आहे. यानूसार आता आयकर विभागाकडून आयकर भरणार्या लाडक्या बहीणींची यादी मागवण्यात आली आहे.
विधानसभा निवणूकीच्या दरम्यान महायुती सरकारने महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना सुरू केली. या योजनेंतर्गत राज्यातील २१ ते ६५ या वर्ष वयोगटातील विवाहीत, विधवा, घटस्फोटीत, परित्यक्त्या आणि निराधार महिला योजनेच्या लाभासाठी पात्र असतील. मात्र, २ लाख ५० हजार रूपये उत्पन्न असणार्या महिला सुध्दा या योजनेचा लाभ घेत असल्याचे समोर आले आहे.
त्यामुळे आता या योजनेतील लाभार्थ्यांची पडताळणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानूसार प्राप्तीकर विभागाच्या अखत्यारित असलेल्या केंंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांची माहिती उपलब्ध करून देण्यास मान्यता दिली आहे. त्यामुळे आता आयकर विभागाकडून याबाबतचा सर्व डेटा उपलब्ध करुन दिला जाणार आहे.
या माहितीच्या आधारावर अडीच लाख रूपयांपेक्षा अधिक उत्पन्न असलेल्या महिलांची यादी तयार करण्यात येणार आहे. या महिलांना या योजनेचा लाभ बंद केला जाणार आहे.मात्र पात्र महिलांना हा लाभ नियमितपणे मिळत राहील असेही शासनाने स्पष्ट केले आहे.





