मोठी बातमी ! स्वातंत्र्यदिनी नाशिकमध्ये मांसविक्री बंद

नाशिक : नाशिक महानगरपालिकेने १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील कत्तलखाने आणि मांसविक्री पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश जारी केले आहेत. याआधी कल्याण, मालेगाव आणि छत्रपती संभाजीनगर येथे अशा प्रकारचे निर्णय घेण्यात आले होते.

कल्याणमध्ये फक्त एका दिवसाची, तर मालेगावमध्ये १५, २० आणि २७ ऑगस्ट अशी तीन दिवसांची बंदी जाहीर करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये १५ ऑगस्टला सर्व कत्तलखाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर नाशिकमध्येही आता बंदी लागू होणार असल्याने यावर राजकीय चर्चा रंगण्याची शक्यता आहे.

महापालिकेच्या माहितीनुसार, नाशिक शहरात सुमारे १६०० कत्तलखाने आहेत. भद्रकाली परिसरातील एकमेव अधिकृत कत्तलखान्याला प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि संबंधित यंत्रणांची परवानगी आहे. मात्र, स्वातंत्र्यदिनी या कत्तलखान्यासह सर्व ठिकाणी मांसविक्री व जनावरांची कत्तल बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

या निर्णयाबाबत काही व्यापाऱ्यांकडून नाराजी व्यक्त होत असली तरी, महापालिका प्रशासनाने बंदीचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. तर, राजकीय पातळीवर या आदेशावरून वादंग निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

error: Content is protected !!