‘या’ भागातील पाणी पुरवठ्याच्या वेळेत बदल

नाशिक । शहराला पाणी पुरवठा करणारया धरणात मुबलक पाणीसाठा उपलब्ध असतांनाही अनेक भागात महिला हंडे घेवून रस्त्यावर उतरत आहेत. शहरी भागात अशी परिस्थिती दिसून येत असल्याने एकूणच पाणी पुरवठयातील विस्कळीतपणा समोर आला आहे. त्यामुळे नागरीकांना मुबलक पाणी मिळावे याकरीता नाशिक महापालिकेने शहरातील काही भागातील पाणी पुरवठयाच्या वेळेत प्रायोगीक बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानूसार काही भागातील जलकुंभ भरण्याच्या वेळेत बदल करण्यात आला आहे.

नाशिक पश्चिम विभागातील प्रभाग क्रमांक १२ मधील तिडके कॉलनी परिसरातील स्त्री मंडळ जलकुंभ, लव्हाटे नगर जलकुंभ व महात्मा नगर जलकुंभ या टाक्या सातपूर विभागातील ६०० मि.मी. व्यासाच्या पाईपलाईनमार्फत शिवाजी नगर जलशुद्धीकरण केंद्र येथून भरल्या जातात. सद्यस्थितीत या जलकुंभांवरून होणारा पाणीपुरवठा कमी दाबाने होत आहे व जलकुंभ पुरेशा प्रमाणात भरले जात नाहीत. या समस्येच्या उपाययोजनेंतर्गत जलशुद्धीकरण केंद्रातून उपलब्ध पाण्याचे फेरनियोजन आवश्यक झाले आहे.या अनुषंगाने, जलकुंभ भरण्याची वेळ व पाणी वितरण वेळेत प्रायोगिक तत्वावर बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे परिसरातील नागरिकांना पुरेशा प्रमाणात व योग्य दाबाने पाणी मिळू शकेल.

यामधे महात्मा नगर जलकुंभ ६० लक्ष लिटर पाण्याची टाकी भरण्याच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. त्यानूसार सकाळी ६ ते ८ व संध्याकाळी ६ ते ८ अशी वेळ असून आता ही वेळ संध्याकाळी ५ ते ८ अशी करण्यात आली आहे. त्यामुळे महात्मानगर, कामगारनगर, पारीजातनगर व सुयोजितनगर या परिसरातील नागरिकांनी पाणीपुरवठा वितरण वेळेत झालेल्या बदलाची नोंद घ्यावी व नाशिक महानगरपालिकेला सहकार्य करावे असे आवाहन कार्यकारी अभियंता पाणी पुरवठा विभाग यांनी केले आहे. स्त्री मंडळ जलकुंभ, लव्हाटे नगर जलकुंभाच्या पाणी पुरवठयाच्या वेळेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

error: Content is protected !!