नाशिक । शहरातील नागरिकांना ऐन पावसाळ्यात पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. शनिवारी, 21 जून रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत नाशिक शहराचा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे. महानगरपालिकेच्या विविध जलशुद्धीकरण केंद्रांमध्ये नवीन व्हॉल्व्ह बसवण्याचे आणि देखभाल-दुरुस्तीची कामे हाती घेण्यात येत असल्यामुळे पाणीपुरवठा थांबविण्यात येणार आहे.
महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने दिलेल्या माहितीनुसार, या कामांच्या पार्श्वभूमीवर रविवारी, 22 जून रोजी सकाळच्या सत्रात पाणी कमी दाबाने पुरवण्यात येणार आहे. स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत नाशिकमधील जलशुद्धीकरण केंद्रे आणि बुस्टर पंपिंग स्टेशनमध्ये विविध विकासकामे सुरू आहेत. या कामांतर्गत स्मार्ट सिटी कंपनीद्वारे नवीन व्हॉल्व्ह व फ्लोमीटर बसवले जात असून, त्यासाठी शटडाऊन आवश्यक असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.
शहरात पावसाळ्यात पाणीटंचाई निर्माण होऊ नये, यासाठी स्काडा प्रणाली बसवण्याचे काम देखील सुरू आहे. पंचवटी जलशुद्धीकरण केंद्र, गंगापूर धरण पंपिंग स्टेशन आणि बसस्थानक परिसरातील विविध देखभाल कामे या दरम्यान पार पडणार आहेत. नागरिकांनी पाणी जपून वापरावे आणि प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन नाशिक महानगरपालिकेने केले आहे.
गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग
दरम्यान, गेल्या दोन दिवसांपासून नाशिकमध्ये सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे गंगापूर धरणातून शुक्रवारी, 19 जून रोजी सकाळी सहा वाजल्यापासून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. सकाळी 500 क्युसेक वेगाने सुरू झालेला विसर्ग 9 वाजेपासून 1,000 क्युसेक करण्यात आला आहे.
धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर असल्याने विसर्ग वाढविण्यात आला आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सध्या धरणाचा उपयुक्त पाणीसाठा 65 टक्क्यांवर पोहोचला असून, गेल्या काही वर्षांत पहिल्यांदाच जून महिन्यात पाणीसाठ्यात इतकी वाढ झाली आहे.










