नाशिक । नाशिक महापालिका निवडणुकीसाठी प्रभागरचनेचा प्रारूप आराखडा अखेर जाहीर झाला असून यामुळे स्थानिक राजकारणात चांगलीच चळवळ सुरू झाली आहे. शुक्रवारी (दि. २२) घोषित करण्यात आलेल्या या आराखड्यात २०१७ च्या निवडणुकीप्रमाणेच रचना कायम ठेवण्यात आली आहे. म्हणजेच, २०११ च्या लोकसंख्या गणनेच्या आधारावर १२२ सदस्यसंख्या, चार सदस्यीय प्रभाग पद्धत आणि पूर्वीप्रमाणेच प्रभाग रचना ‘जैसे थे’ राहणार आहे.
महापालिकेच्या प्रवेशद्वारावर नकाशा आणि माहिती नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आली असून, इच्छुकांना ४ सप्टेंबरपर्यंत हरकती व सूचना मांडण्याची संधी दिली आहे. नगरविकास विभागाच्या सूचनेनुसार, २९ चार सदस्यीय व २ तीन सदस्यीय असे एकूण ३१ प्रभाग अस्तित्वात आले आहेत. यामध्ये प्रभाग क्रमांक १५ व १९ हे पुन्हा तीन सदस्यीय राहिले आहेत. प्रत्येक प्रभागाची सरासरी लोकसंख्या सुमारे ४८ हजार ठरली आहे.
प्रभागरचनेवरून महायुतीत काही मतभेद झाले होते. भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांनी राज्य सरकारकडे तक्रारी केल्या होत्या. मात्र, आराखडा जसाच्या तसा ठेवण्यात आल्याने तो वाद आता निवळल्याचे दिसत आहे.
१३ मार्च २०२२ पासून महापालिकेत प्रशासकीय राजवट लागू आहे. त्यामुळे निवडणुकीकडे राजकीय पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे डोळे लागले आहेत. प्रारूप प्रभागरचना जाहीर झाल्याने आता निवडणूक प्रक्रियेला गती मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
अंतिम प्रभाग रचना ऑक्टोबरपर्यंत
राज्य सरकारने जाहीर केलेल्या कार्यक्रमानूसार ४ सप्टेंबपर्यंत सूचना व हरकती मांडता येणार आहे. १२ सप्टेंबरपर्यंत सुनावणी घेतली जाईल. राज्य निवडणूक आयोग ६ ऑक्टोबरपर्यंत अंतिम प्रभाग रचना प्रसिध्द करणार आहे. प्रभाग रचना अंतिम केल्यानंतर मतदारयादी तपासणीचा कार्यक्रम दीड महिने चालेल. त्यामुळे साधारण जानेवारी महिन्यात निवडणूका होतील.
असे आहे आरक्षण
एकूण जागा १२२
जनरल ६२
ओबीसी ३३
अनुसूचित जाती १८
अनुसूचित जमाती ०९
महिला आरक्षण ६१
प्रभाग स्थिती
एकूण सदस्य १२२
एकूण प्रभाग ३१
चार सदस्यीय २९
तीन सदस्यीय ०२











