नाशिक । आगामी पावसाळी कालावधीत नैसर्गिक आपत्ती निर्माण झाल्यास नाशिक विभागातील पाचही जिल्ह्यांमध्ये प्रशासन सज्ज राहावे आणि नागरिकांना तत्काळ मदत मिळेल, यासाठी काटेकोर नियोजन करण्याच्या सूचना विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी दिल्या.
डॉ. गेडाम यांनी आज दूरदृष्यप्रणालीद्वारे विभागातील नाशिक, अहमदनगर, धुळे, नंदुरबार व जळगाव या जिल्ह्यांचा मान्सूनपूर्व तयारी संदर्भात आढावा घेतला. या बैठकीस सर्व जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी व जलसंपदा, कृषी, महावितरण, आरोग्य, महसूल आदी विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
आपत्कालीन आराखडा, साधनसामग्रीची उपलब्धता, पूर परिस्थितीत गावांचा संपर्क तुटल्यास तातडीची उपाययोजना, आरोग्य सेवा, नालेसफाई आदी बाबींकडे विशेष लक्ष द्यावे, अशा सूचना त्यांनी दिल्या. ‘आपदा मित्र’ व स्वयंसेवी संस्थांचा डेटाबेस तयार ठेवण्याची सूचना देत त्यांनी स्थानिक स्तरावरही मदत कार्य प्रभावीपणे राबवण्याचा आग्रह धरला.
धरणांच्या बॅकवॉटरमुळे उद्भवणार्या आपत्कालीन परिस्थितीवर वेळेत प्रतिसाद देणे, सर्व जिल्ह्यांमध्ये आपत्कालीन नियंत्रण कक्ष कार्यान्वित ठेवणे आणि माहिती तत्काळ विभागीय आयुक्तालयाकडे पाठवणे, यावरही भर देण्यात आला.
विशेषता प्रत्येक गावातील परिस्थिती लक्षात घेऊन त्याठिकाणी आपदा मित्रांना प्रशिक्षण देऊन त्यांच्या मार्फत मदत कार्य राबविणे, इतर स्वयंसेवी संस्थांची मदत होईल यादृष्टीने त्यांचा डाटा तयार ठेवणे, आपत्कालीन परिस्थितीत लागणार्या वस्तू, साधने तत्काळ उपलब्ध होतील, याचे काटेकोर नियोजन करण्याच्या सूचनाही डॉ. गेडाम यांनी दिल्या.











