पुणे — राज्याचे उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी २५ एप्रिल रोजी होणाऱ्या पुणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीसाठी बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांना पत्र पाठवून उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले होते. मात्र, सुप्रिया सुळे यांनी ही बैठक चुकवावी लागणार असल्याचे कळवून या निमंत्रणाला नकार दिला आहे. परिणामी, दादा आणि ताई एकाच व्यासपीठावर एकत्र दिसण्याचा योग या वेळेस तरी टळला आहे.
सुप्रिया सुळे यांनी उत्तर पत्र लिहून आपली असमर्थता स्पष्ट केली आहे. त्यांनी नमूद केले आहे की, २५ एप्रिल रोजी नवी दिल्लीत लोकसभेच्या ‘इन्कमटॅक्स बिल २०२५’ वर चर्चा करण्यासाठी संसदीय समितीची महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्या बैठकीच्या त्या सदस्य असल्याने उपस्थित राहणे त्यांच्यासाठी अनिवार्य आहे. त्यामुळे पुणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सहभागी होणे त्यांना शक्य होणार नसल्याचे त्यांनी अजित पवारांना कळवले.
दादा-ताई यांच्यातील हा औपचारिक पत्रव्यवहार सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनला आहे. अनेकांच्या नजरा या दोघांच्या राजकीय संबंधांवर केंद्रित असताना, या बैठकीच्या निमित्ताने ते एकत्र येणार का, याकडे विशेष लक्ष होते. मात्र, ताईंच्या नकारामुळे तो क्षण सध्या तरी लांबणीवर गेला आहे.
या पार्श्वभूमीवर आगामी काळात दोघे एकत्र कधी दिसतील, याकडे राजकीय वर्तुळासह जनतेचे लक्ष लागले आहे.











