मुंबई । राज्याच्या राजकारणात सध्या अनेक नविन समीकरणे तयार होत आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. गेल्या काही दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार अशी चर्चा सुरू आहे. त्यातच याबाबत नव्या नेतृत्वाने निर्णय घ्यावा असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केल्याने खासदार सुप्रिया सुळें काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले असतांना सुप्रिया सुळे यांनी पाऊस आल्यावर छत्री घ्यायची की रेनकोट हे त्यावेळी ठरवावे लागते असे सूचक वक्तव्य केल्याने राष्ट्रवादीच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महाराष्ट्रातील राजकारणात गेल्या काही काळात मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. सुरुवातीला महाविकास आघाडी आणि नंतर महायुतीच्या रूपात राज्यात सत्ता स्थापन झाली. या सत्तांतरामध्ये अनेक अनपेक्षित राजकीय समीकरणं तयार झाली आणि अनेक तज्ज्ञांचे अंदाज चुकीचे ठरले.
राष्ट्रवादी काँग्रेस – शरद पवार गटाने नव्या रणनीतीचा स्वीकार केला असून, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजप वगळता इतर कोणत्याही पक्षासोबत युती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, या नव्या धोरणानुसार स्थानिक स्तरावर अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या गटांसोबतही युतीचा पर्याय खुला ठेवण्यात आला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, युतीसंबंधीचे सर्व अधिकार स्थानिक नेत्यांकडे दिले जाणार आहेत. महाविकास आघाडीतील घटक पक्ष मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत एकत्र लढण्यास फारसे इच्छुक नसल्याचे संकेत मिळत आहेत. अद्याप या संदर्भात महाविकास आघाडीत कोणतीच ठोस चर्चा झालेली नाही.
या पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळे यांना विचारण्यात आलं असता त्यांनी स्पष्ट केलं की, गेल्या 26 वर्षांपासून आमचं ठरलेलं धोरण आहे की स्थानिक युतीबाबत निर्णय स्थानिक नेतेच घेतात. शरद पवार साहेब सत्तेचं विकेंद्रीकरण करतात, ते अधिकार देतात आणि सक्षमतेला प्राधान्य देतात. अजित पवार गटासोबत युती होण्याबाबत विचारलं असता, सुप्रिया सुळे यांनी सूचक प्रतिक्रिया दिली. पाऊस आल्यावर छत्री घ्यायची की रेनकोट हे त्यावेळी ठरवावं लागतं.
या विधानामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं असून, स्थानिक पातळीवर राष्ट्रवादीच्या नव्या धोरणामुळे नवे समीकरण तयार होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.











