सतीश शुक्ल यांच्यावर अविश्वास ठराव; चंद्रशेखर पंचाक्षरी नवे अध्यक्ष

नाशिक : नाशिक पुरोहित संघामध्ये मोठी घडामोड घडली असून संघाचे विद्यमान अध्यक्ष सतीश शुक्ल यांच्यावर एकमताने अविश्वास ठराव मंजूर करण्यात आला. त्यांच्या एककल्ली आणि एकतर्फी कारभाराला कंटाळून पुरोहित संघाच्या शेकडो सभासदांनी हा ठराव मंजूर करत अध्यक्षपदावरून त्यांना बाजूला केले.

या पार्श्वभूमीवर आज झालेल्या विशेष बैठकीत संघाच्या नव्या अध्यक्षपदी चंद्रशेखर पंचाक्षरी यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. बैठकीस पुरोहित संघाचे १०० हून अधिक सभासद उपस्थित होते. सर्व उपस्थितांनी एकमताने पंचाक्षरी यांच्या नावाला पाठिंबा दिला.

गेल्या काही महिन्यांपासून संघाच्या कामकाजावर नाराजी वाढत होती. विशेषतः नुकत्याच पार पडलेल्या कुंभमेळ्याच्या नियोजन बैठकीत सतीश शुक्ल यांनी कोणालाही विश्वासात न घेता निर्णय घेतले, असा आरोप अनेक सदस्यांनी केला. संघाच्या निर्णय प्रक्रियेत पारदर्शकता नसल्याची तक्रारही करण्यात येत होती. तसेच, संघाच्या कामकाजात स्वतः आणि आपल्या मुलापुरते मर्यादित सहभाग ठेवणे, इतर सभासदांना दुर्लक्षित करणे यामुळे अनेक सदस्य नाराज होते.

या पार्श्वभूमीवर झालेल्या बैठकीत सतीश शुक्ल यांच्याविरोधात अविश्वास ठराव मांडण्यात आला आणि तो सर्वसंमतीने मंजूर करण्यात आला. त्यानंतर अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडीत चंद्रशेखर पंचाक्षरी यांची बिनविरोध निवड झाली.

पंचाक्षरी हे गेल्या अनेक वर्षांपासून नाशिकमध्ये धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यात सक्रिय आहेत. त्यांनी पूर्वी अनेक धार्मिक समित्यांमध्ये जबाबदारी सांभाळली असून त्यांचा संघात मोठा जनाधार आहे.

या निवडीनंतर बोलताना पंचाक्षरी म्हणाले, “संघाच्या कामकाजात पारदर्शकता, एकजूट आणि सर्वसमावेशकता ठेवून पुढे वाटचाल करणार आहोत. सर्व सभासदांचा सल्ला आणि सहभाग घेऊन निर्णय घेण्यावर भर राहील.

मात्र आता याला सतीश शुक्ल काय उत्तर देतात हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. शुक्ल हे गेल्या अनेक वर्षांपासून पुरोहित संघाची धुरा सांभाळत आहेत.

error: Content is protected !!