नाशिक । उन्हाळ्यात पाण्याच्या टंचाईमुळे तहानलेल्या पक्ष्यांना मदतीचा हात देण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेस आणि मदत फाउंडेशनच्या वतीने ‘बर्ड फिडर’ वाटप उपक्रम राबविण्यात आला. बीडी कामगार नगर येथील राष्ट्रसंत जनार्दन स्वामी विद्यालयात हा उपक्रम पार पडला.
युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे यांच्या हस्ते शालेय विद्यार्थ्यांना बर्ड फिडर वाटप करून त्यांना उन्हाळ्यात पक्ष्यांसाठी पाण्याची सोय करण्याचे महत्त्व पटवून देण्यात आले.
गेल्या काही वर्षांपासून शहराध्यक्ष अंबादास खैरे यांच्या संकल्पनेतून पक्ष्यांसाठी पाण्याची सोय उपलब्ध करून देण्याचा स्तुत्य उपक्रम सुरू आहे. वाढत्या उष्णतेमुळे शहरातील तापमान ४० अंशांवर पोहोचले आहे. त्यामुळे पाणवठे आटले असून, अनेक पक्ष्यांना तहान भागवण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.
अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांमार्फत घर, गॅलरी, अंगण आणि झाडांवर बर्ड फिडर ठेवून पाणी आणि दाण्याची व्यवस्था करावी, हा या उपक्रमाचा मुख्य हेतू होता.
या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये निसर्ग, पक्षीप्रेम आणि सामाजिक भान जागवण्याचे कार्य करण्यात येत आहे. लहान वयातच निसर्ग संवर्धनाची बीजे मनात रोवली जात असून, शुद्ध पाणी आणि अन्न मिळवण्याचा पक्ष्यांचा संघर्ष विद्यार्थ्यांना समजावा, यासाठी बर्ड फिडर वाटपाचा निर्णय घेतला गेला.
या उपक्रमात कुलदीप जेजुरकर, संदीप खैरे, सागर तांबे, रोहित जाधव, जयदीप सोळंकी, विनायक जाधव यांच्यासह शाळेतील शिक्षक वर्ग, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.








