Manoj Jarange : मनोज जरांगेंचा मुख्यमंत्री फडणवीसांना इशारा

मुंबई । मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज पाचवा दिवस. या आंदोलनाला वेगवेगळ्या स्तरांवरून प्रतिसाद मिळत असताना मुंबई उच्च न्यायालयाने सरकारला तोडगा काढण्याचे निर्देश दिले आहेत. दुसरीकडे, मुंबई पोलिसांनी आंदोलनाच्या नियमांचे उल्लंघन केल्याच्या कारणावरून जरांगेंच्या वकिलांना नोटीस पाठवली आहे. मात्र मनोज जरांगे यांनी आता ठाम भूमिका घेत थेट मुख्यमंत्री फडणवीसांनाच इशारा दिला आहे.

या नोटिशीवर प्रतिक्रिया देताना जरांगे म्हणाले, गेल्या दोन वर्षांपासून आम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलन करत आहोत. कायद्याच्या चौकटीत राहूनच आमचा लढा सुरू आहे. न्यायालय आमच्यासाठी न्याय देईल, याची खात्री आहे. कोर्टाच्या आदेशानुसार आम्ही त्वरित वाहने काढली आहेत. त्यामुळे वाहतूककोंडीचा प्रश्नच नाही. आम्ही लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन करतो आणि पुढेही तसाच करणार आहोत.

त्यांनी पुढे स्पष्ट केले की, मागण्यांची अंमलबजावणी झाल्याशिवाय ते मुंबई सोडणार नाहीत. मराठा आणि कुणबी एकच असल्याचा शासन निर्णय, हैद्राबाद गॅझेटची अंमलबजावणी, आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणे, तसेच आमच्यावर हल्ला करणार्‍या पोलिसांवर कारवाई – या मागण्या मान्य न झाल्यास आम्ही इथून हलणार नाही.

सरकारने काहीही केले तरी आमची भूमिका बदलणार नाही, असे जरांगे ठामपणे म्हणाले.
फडणवीस हे न्यायालयाला खोटी माहिती सादर करत असल्याचा आरोप त्यांनी केला. दरम्यान, आझाद मैदानात सुरू असलेले उपोषण शांततेत पार पडत असून आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन केल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

error: Content is protected !!