नाशिक । आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या माध्यमातून नाशिकच्या अध्यात्मिक पर्यटनाला चालना देण्यासाठी टेंट सिटी, पर्यटन क्लस्टरची योजना आखण्यात आली आहे. याकरीता पर्यटन विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे यांनी विभागाचा आढावा घेतला. यावेळी टेंट सिटीसोबतच जोतिर्लिंगांना जोडणारे आध्यात्मिक हेलिकॉप्टर सर्किट तयार करण्याबाबतही त्यांनी महत्त्वाचे निर्देश दिले.टेंट सिटीसाठी त्र्यंबक रोडवरील खादी ग्रामोद्योगाची जमीन निश्चित करण्यात आल्याची माहिती आयुक्त शेखर सिंह यांनी दिली.
नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा विकास प्राधिकरणामार्फत कुंभमेळ्याच्या तयारीस गती देण्यात येत आहे. नुकतेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते तब्बल साडेपाच हजार कोटींच्या विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले. त्यानंतर टेंट सिटी उभारणी आणि आवश्यक उपाययोजनांवर दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे बैठक घेण्यात आली. या बैठकीत प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह, नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त जलज शर्मा, विविध जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी आणि संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
टेंट सिटीसोबतच प्रदर्शन केंद्र
प्रधान सचिव खंदारे यांनी कुंभमेळा २०२७ च्या दृष्टीने उभारण्यात येणार्या टेंट सिटीच्या जागेसंदर्भात आढावा घेतला. टेंट सिटीच्या परिसरात प्रदर्शन केंद्र उभारण्याचा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना त्यांनी केल्या. संपूर्ण राज्यासह बाहेरील राज्यांतून येणार्या भाविकांना लक्षात घेऊन सापुतारा, जव्हार, मोखाडा आणि समृद्धी महामार्गालगत टेंट सिटी उभारण्याचे नियोजन करण्यात यावे, असेही त्यांनी सांगितले. यामुळे नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे येणार्या भाविकांच्या निवास व्यवस्थेत मोठा दिलासा मिळेल.
जोतिर्लिंगांना हेलिकॉप्टर सेवेने जोडणार
औंढा नागनाथ – परळी वैजनाथ – घृष्णेश्वर – त्र्यंबकेश्वर – भीमाशंकर या पाच जोतिर्लिंगांना जोडणारे अध्यात्मिक हेलिकॉप्टर सर्किट निर्माण करण्याचे निर्देशही प्रधान सचिवांनी दिले. यातून धार्मिक पर्यटनाला मोठी चालना मिळणार असून, भाविकांसाठी प्रवास अधिक सोयीस्कर होणार आहे. तसेच एमटीडीसी रिसॉर्टची क्षमता वाढविण्यासाठी खासगी भागीदारीचा विचार, जोतिर्लिंग व कुंभ पर्यटनाचे एकसमान ब्रँडिंग आणि पर्यटन क्लस्टर विकासासाठी वन विभागाचे सहकार्य घेण्याच्याही सूचना त्यांनी केल्या.
कलाकुंभमध्ये स्थानिकांना व्यासपीठ
नाशिकमध्ये होणार्या कलाकुंभमध्ये स्थानिक कारागीर, स्वयं-साहाय्य गट, हस्तकला व्यवसायिकांसाठी दुकाने उपलब्ध करून देण्याबाबतही चर्चा झाली. यात राज्य मंडप, कुंभ संग्रहालय, नदी मंडप, खुलं थिएटर, कला प्रदर्शन, ‘एक जिल्हा-एक उत्पादन’ दुकाने, तसेच यज्ञ, पूजापाठ, प्रवचनांचे आयोजन यांचा समावेश असणार आहे.











