साधू-महंतांच्या विशेष बडदास्त, सत्कारापासून जेवणाचा मेन्यू पर्यंत सगळंच असेल ‘खास’

नाशिक । येत्या रविवारी (दि. १ जून) नाशिकमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर महत्त्वपूर्ण आखाडा परिषदेची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीस १३ प्रमुख आखाड्यांचे साधू-महंत उपस्थित राहणार असून त्यांच्या स्वागत-सत्कारात कोणतीही कसूर राहू नये यासाठी प्रशासनाने विशेष तयारी केली आहे.

या बैठकीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात जोरदार तयारी सुरू असून भोजन व्यवस्थेपासून ते सुरक्षेपर्यंत सर्वच बाबींमध्ये अधिक लक्ष दिलं जात आहे. विशेष म्हणजे, साधू-महंतांच्या अभिरुचीनुसार जेवणात खास महाराष्ट्राचा पारंपरिक आमरस व पुरणपोळीचा बेत ठेवण्यात आला आहे. अल्पोपहारात केशरयुक्त दूध व सुका मेवा देण्यात येणार आहे.

असे आहे नियोजन
दुपारी १२ वाजता प्रारंभ होणार्‍या या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते साधू-महंतांचे स्वागत होईल. त्यानंतर कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन प्रास्ताविक करतील. विभागीय आयुक्त डॉ. प्रविण गेडाम सिंहस्थ कुंभमेळ्याचे सविस्तर नियोजन सादर करतील. त्यानंतर आखाडा प्रतिनिधी आपापल्या सूचना, अपेक्षा आणि मतप्रदर्शन करतील. या सत्रात कुंभमेळ्याच्या प्रमुख शाही पर्वणीच्या तारखाही जाहीर केल्या जाणार आहेत. शेवटी मुख्यमंत्र्यांचे समारोपपर भाषण व पत्रकार परिषद होणार आहे.

प्रशासनाची तयारी
देशभरातून संत महंत उपस्थित राहणार असल्याने त्यांच्या पाहुणचारात कुठेही कसुर राहू नये याकरीता प्रशासन सुक्ष्म नियोजन करत आहे. अगदी सत्कारापासून ते त्यांचा अल्पोपहार तसेच भोजन व्यवस्थाही खास असणार आहे. साधूंना अभिप्रेत अशी पारंपरिक पाककृती दिली जाणार आहे. विशेषतः देशभरातील पाहुण्यांसमोर महाराष्ट्राच्या खाद्यसंस्कृतीचे प्रतिनिधित्व होईल, याची खबरदारी घेण्यात आली आहे.

सुरक्षा व्यवस्था कडक
मुख्यमंत्री, मंत्री, व प्रमुख साधू-महंतांच्या उपस्थितीमुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. केवळ आमंत्रित व्यक्तींनाच सभागृहात प्रवेश देण्यात येईल. आखाडा परिषदेबाहेरील इतर महंतांची उपस्थिती होण्याची शक्यता गृहीत धरून, कोणत्याही अनधिकृत व्यक्तीस प्रवेश न देण्याचा प्रशासनाने स्पष्ट आदेश दिला आहे.

प्रयागच्या धर्तीवर नाशिक कुंभमेळा
या बैठकीतून प्रयागराजप्रमाणेच महाराष्ट्रातही साधू-महंतांचा सन्मान व कुंभमेळ्याच्या व्यवस्थापनात पारदर्शकता आणि शिस्तीचा आदर्श निर्माण करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. यामुळे नाशिक कुंभमेळा देशभरात अधिक भव्य आणि सुनियोजित पद्धतीने साजरा होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

error: Content is protected !!